Christian community marches : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जालना जिल्ह्यातील सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने सोमवार, 30 जून रोजी दुपारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील महात्मा गांधी चौकातून निघालेला हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
जालना : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जालना जिल्ह्यातील सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने सोमवार, 30 जून रोजी दुपारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील महात्मा गांधी चौकातून निघालेला हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
आमदार गोपीचंद पडळकरांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याच्या निषेध म्हणून जालन्यात सोमवारी ख्रिश्चन समाजाने हा आक्रोश मोर्चा काढला. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करून सरकारने पडळकरांचा राजीनामा घेण्याची मागणी ख्रिश्चन समाजाच्या वतीने करण्यात आली. यावेळी मोर्चेकऱ्यांनी पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला. काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी सांगलीतील ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येशी ख्रिश्चन धर्मगुरूंचा कोणताही संबंध नसताना ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्याची आणि हातपाय तोडण्याची धमकी देत बक्षीस देण्याची भाषा आमदार पडळकर यांनी केली होती. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर मोर्चेकर्यांनी सभा घेऊन पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांची आमदारकी मुख्यमंत्र्यांनी रद्द करावी, अशी मागणी या मोर्चात सहभागी झालेल्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी केली.
यावेळी ख्रिश्चन समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या मोर्चात राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते.