Bus falls in river : भुसावळ येथून वाशिमकडे जाणारी खासगी प्रवासी बस बाळापूर येथील भिकुंड नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी बसमधील प्रवाशांना काढण्यास सुरुवात केली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
अकोला: भुसावळ येथून वाशिमकडे जाणारी खासगी प्रवासी बस बाळापूर येथील भिकुंड नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी बसमधील प्रवाशांना काढण्यास सुरुवात केली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
प्राप्त माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील काही भाविक अयोध्या यात्रा करून भुसावळ येथे उतरले. तेथून ते परतीच्या प्रवासासाठी खासगी बसने वाशिमकडे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान बाळापुर जवळील भिकुंड नदीजवळ चालकाचा गेल्याने बस भिकुंड नदीत कोसळली. या बस मध्ये एकूण ४९ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. बस कोसळताच गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली.
पुलाला कठडे बसविण्याची मागणी
या नदी वरील पुलाला कठडे नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या पुलावर कठडे बसवण्याची मागणी बाळापूर शहरातील नागरिकांनी केली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.