Buldhana Crime : चिखली तालुक्यातील अंबाशी येथील एका १० वर्षाच्या चिमुकल्याचे २२ जुलै रोजी अपहरण झाले होते. पोलिस चिमुकल्याचा शोध घेत असतानाच त्याचा खून झाल्याचा धक्कादाय प्रकार बुधवार २४ जुलै रोजी उघडकीस आला.

चिखली (जि. बुलढाणा) : चिखली तालुक्यातील अंबाशी येथील एका १० वर्षाच्या चिमुकल्याचे २२ जुलै रोजी अपहरण झाले होते. पोलिस चिमुकल्याचा शोध घेत असतानाच त्याचा खून झाल्याचा धक्कादाय प्रकार बुधवार २४ जुलै रोजी उघडकीस आला. चिमुकल्याचा खून हा त्याच्या सख्या आतेभावानेच केल्याचे समोर आले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक अरहान शेख (१०वर्ष) हा सोमवार २२ जुलै रोजी घरासमोर खेळत होता. शाळेत जाण्याची वेळ झाल्याने त्याच्या आई वडिलांनी त्याला बोलावले होते. परंतू घराबाहेर दिसला नाही. बराच वेळ झाला मात्र अरहान न दिसल्याने त्याच्या आई वडिलांनी गावातील लोकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचा थांग पत्ता लागत नसल्याने वडिलांनी मुलगा हरवल्याची तक्रार चिखली पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान अरहानचे अपहरण झाले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्या अनुषंगाने चिखली पोलिसांनी तपास कार्यास सुरुवात केली. तपासादरम्यान २३ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अरहानच्या आतेभावानेच त्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कदायक माहिती समोर आली. या नंतर पोलिसांनी आरोपी आतेभावाला अटक केली. चौकशी दरम्यान त्याने अरहानचा खून केल्याची कबुली दिली. त्याच्या हत्येनंतर अरहानचा मृतदेह बोरीमध्ये टाकून शेणाच्या उकीरड्यात टाकल्याचेही त्याने सांगितल्याची माहिती चिखली पोलिस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी दिली.