मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून मदत आणा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन 

पैठण :  केंद्रात तुमचंच सरकार आहे, मराठवाड्यातील ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिल्लीत जाऊन मदत आणा असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारला केलं आहे. सपकाळ यांनी सकाळी सात वाजता जिल्ह्यातील पाचोड येथून अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. 

पैठण :  केंद्रात तुमचंच सरकार आहे, मराठवाड्यातील ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिल्लीत जाऊन मदत आणा असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारला केलं आहे. सपकाळ यांनी सकाळी सात वाजता जिल्ह्यातील पाचोड येथून अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. 

यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी आभाळ फाटलं असून सरकारनं मदत द्यायला उशीर केला आहे. हा राजकारण आणि आरोपांचा प्रसंग नाही पण अवकाळी पाऊस उन्हाळ्यापासून सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी आणि खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 5 लाखांची मदत व्हावी, राज्यात विदारक परिस्थिती निर्माण झाली असून ताबडतोब शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. याच बरोबर सत्ताधाऱ्यांनी फोटो काढण्याचे नाटक बंद करावे – निवडणुकीत तुम्ही दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करायला पाहिजे, तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. गावागावात सुरू असलेली बँकांची सक्तीची कर्ज वसुली बंद करावी. मोफत बियाणे आणि खते द्यावीत अशी मागणीही त्यांनी केली. 

वाटाण्याच्या अक्षता नकोत 

मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाची दाहकता तीव्र असून शेतकरी या संकटातून उभा राहणे कठीण आहे. त्यामुळे सरकारकडून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे. तो निर्णय दोन ते तीन दिवसात घेतलाही जाईल मात्र वाटाण्याच्या अक्षता नकोत सरकारने ठोस उपाय योजना करायला अशी अशी मागणीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. आश्वासनाचा सुकाळ आणि सरकारी योजनेचा दुष्काळ पाहायला मिळत आहे. सरकारने विशेष पॅकेज द्यावे, तुमचे केंद्र आणि राज्यात सरकार आहे. ट्रिपल इंजनच्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी बांधावर उभं राहून फोटो काढण्याचे नाटक बंद करून दिल्लीत आपली पूर्ण पत लावून राज्याला दिलासा द्यावा असेही ते म्हणाले. 

कुंभमेळ्याची अतिरिक्त तरतूद वापरा 

नाशिक येथील कुंभमेळ्याची अतिरिक्त तरतूद ही दुष्काळी भागाकडे वळवा, तसंच शक्तीपीठ मार्ग थांबवून ती मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी सपकाळ यांनी केली. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यायला हवा. आपण सरकारला मायबाप म्हणतो मात्र हे सर्व इव्हेंट करत आहेत. मदतीचा हात देणे माणुसकी असून मात्र आमचे फोटो पाहा आणि पानफूल वाहा असे प्रकार या मदत कर्यात सुरू असल्याची टीका त्यांनी केली. पीक विम्याचा मराठवाड्यात मोठा घोटाळा बाहेर येऊ नये म्हणून योजना बंद केली. तसंच या विमा कंपनींना खुश करणाऱ्या योजना आहेत. पाऊस सुरू होण्याच्या पूवच जिथं जिथं पाऊस झाला तिथं काँग्रेस गेली आहे. काँग्रेसने बांधावर जाण्याची भूमिका घेतली अशी माहिती सपकाळ यांनी दिली.

काँग्रेसकडून मदतीचा ओघ सुरू 

काँग्रेस पक्षाकडून मदतीचा ओघ सुरू झाला असून आम्ही फक्त फोटोसाठी नाही तर मदतीसाठी जात आहोत. हे काय कारवाई करतात हे पाहण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारीकडे शिष्टमंडळ पाठवत आहे. या परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं, या सर्वसमावेशक भूमिकेला आमचे सहकार्य आहे. केवळ बोलाचाच भात आणि बोलाची कढी होऊ नये असे मत त्यांनी मांडले. 

मंत्री महाजनांच्या वक्तव्याचा निषेध 

भाजपा नेते तसेच सरकारमधील मंत्री गिरीष महाजन यांनी एका शेतकऱ्याला पैसे खिशात घेऊन फिरतो का? असा अजब प्रश्न विचारला त्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका करत, 50 खोके एकदम ओके ही घोषणा कुठून आली हे माहीत आहे. सरकार पाडायचे आमदार फोडायचे, निवडणुकीत पैसा फेक तमाशा देख तेव्हा खिशात पैसा यायचा आता शेतकऱ्यांना मदत द्यायची म्हटले तर चुकीचे विधान करायचे हा प्रकार संतापजनक असल्याचे म्हणत मंत्री महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तुम्ही शेतकऱ्यांची जबाबदारी न स्वीकारता अशी उद्धट उत्तरं देणं हा सत्तेचा अहंकाराचा कळस झाला आहे. 240 आमदार पाठीशी असल्याने राक्षसी बहुमताचा अहंकार बाळगत असल्याचीही टीका त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »