छत्रपती संभाजीनगर : तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या मिटमिटा येथील प्लॉटचे क्षेत्रदुरुस्तीच्या आदेशाकरीता पाच फायलींचे प्रत्येकी 60 हजार रुपये प्रमाणे 3 लाख रुपयांची लाचेची मागणी करुन साथीदारांच्या मदतीने लाच घेणाऱ्या अप्पर तहसीलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई 15 मे रोजी करण्यात आली.

नितीन गर्जे (45 वर्ष), रा. माय होम सोसायटी, शहानुरमियॉ दर्गाह परिसर असे लाचखोर अप्पर तहसिलदाराचे नाव आहे. तर नितीन घुमा राठोड (38 वर्ष), रा. रेणुकानगर, शिवाजीनगर, सोहेल जुबेर बहाशवान (29 वर्ष), रा. मरकज मस्जीदजवळ, लोटाकारंजा असे त्याला मदत करणाऱ्या खासगी इसमांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या नावे आणि नातेवाईकांच्या नावाने मिटमिटा येथे प्लॉट असून या प्लॉटचे क्षेत्रदुरुस्तीच्या आदेशासाठी डिसेंबर – 2024 पासून पाच फायली अप्पर तहसीलदार यांच्याकडे सुनावणीसाठी प्रलंबित होत्या. एप्रिल महिन्यात तक्रारदार सुनावणीसाठी हजर झाले असता सुनावणीचा निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी नितीन गर्जे यांचे कामकाज पाहणाऱ्या खासगी इसमाने पाच प्लॉटचे प्रत्येकी 60 हजार रुपये प्रमाणे तीन लाख रुपये लाच देण्याची मागणी केली होती.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची खातरजमा केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे, पोलिस निरीक्षक वाल्मीक कोरे, पोलिस अंमलदार राजेंद्र जोशी, अनवेज शेख आदींच्या पथकाने सापळा रचून तीन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या नितीन राठोड व सोहेल जुबेर बहाशवान या दोघांसह अप्पर तहसीलदार नितीन गर्जे यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी करीत आहेत.