Boycott on voting in Akola : साध्या मुलभूत सुविधाही नागरिकांना मिळत नसल्याने अकोला पश्चिम मतदारसंघातील भाईपुरा परिसरातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
अकोला : साध्या मुलभूत सुविधाही नागरिकांना मिळत नसल्याने अकोला पश्चिम मतदारसंघातील भाईपुरा परिसरातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. सोमवारी रात्री उशीरा येथील मोहल्ला समितीने बैठक घेवून हा निर्णय घेतला.
विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदार संघातील प्रकाभ क्र. २८ मध्ये हा परिसर येतो. या भागात भोईपुरासह जेतवन नगर, धोबी खदान हे भाग असून येथे मतदारांची मोठी संख्या आहे. या परिसरातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था, पाणीपुरवठा करणाऱ्या नळांच्या पाईप लाईनची समस्या तसेच मोहल्ल्यातील नागरीकांसाठी असलेली एकमेव सार्वजनीक पाणीपुरवठा करणाऱ्या बोर ला पाईपलाईन लावून प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणीपुरवठा करण्यात यावा आदी मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. जोपर्यंत या मागण्या निकाली लागत नाहीत, तोपर्यंत सर्वच प्रकारच्या निवडणूकांवर बहिष्कार टाकण्यात आल्याचा निर्धार बैठकीत उपस्थित असणाऱ्या नागरीकांनी केला.
नगरसेवकांनीही आश्वासन पाळले नाही
महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या निवडणुकीत तसेच लोकसभेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान प्रभागात भेट देण्यासाठी आलेल्या नगरसेवकांना तसेच उमेदवारांना मोहल्ल्यातील नागरीकांनी सार्वजनिक शौचालयाच्या दुरावस्थेबाबत अवगत केले असता निवडणूकीनंतर सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुक झाल्यानंतरही आजपर्यंत त्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्याने परिसरातील नागरीकांना शौचालयाच्या दुरावस्थेमुळे त्रासाला समोर जावे लागत आहे.