BJP’s Kuche, Lonikar, Shiv Sena’s Khotkar wins in Jalna district : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुती क्लिन स्विप मिळवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जालना मतदारसंघात शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी कॉंग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा, बदनापुरात भाजपाचे नारायण कुचे यांनी शरद पवार गटाच्या बबलू चौधरी यांचा तर परतूर येथे भाजपाचे बबनराव लोणीकर यांनी ठाकरे गटाचे आसाराम बोराडे यांचा पराभव केला आहे.
विनोद काळे / जालना : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुती क्लिन स्विप मिळवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जालना मतदारसंघात शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी कॉंग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा, बदनापुरात भाजपाचे नारायण कुचे यांनी शरद पवार गटाच्या बबलू चौधरी यांचा तर परतूर येथे भाजपाचे बबनराव लोणीकर यांनी ठाकरे गटाचे आसाराम बोराडे यांचा पराभव केला आहे. तर घनसावंगी मतदारसंघात शिवसेनेचे हिकमत उढाण यांनी शरद पवार गटाचे राजेश टोपे यांना मोठ्या फरकाने पिछाडीवर टाकलेले आहे. भोकरदन मतदारसंघात भाजपाचे संतोष दानवे हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
परतूर मतदारसंघात 1 ते 26 फेरी आणि पोस्टल मतदान मिळून भाजपाचे बबनराव लोणीकर यांनी 70 हजार 645 मतांनी विजय मिळविला. त्यांनी ठाकरे शिवसेनेचे आसाराम बोराडे यांचा पराभव केला. बोराडे यांना 65 हजार 915 मते मिळाली. तर कॉंग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुरेश जेथलिया यांनी 53 हजार 921 मते घेतली. अखेर लोणीकर हे 4730 मतांनी विजयी झाले. बदनापुरात भाजपाचे नारायण कुचे यांनी शरद पवार गटाचे बबलू चौधरी यांचा पराभव केला.
जालना मतदारसंघात शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी जवळपास 30 हजार मतांच्या फरकाने विजय मिळविला. येथे कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार अब्दुल हाफिज यांनी 28 हजारांहून अधिक मते घेत कॉंग्रेसच्या गोरंट्याल यांच्या मतपेटीला छेद दिला. भोकरदन येथे भाजपाचे संतोष दानवे यांनी 19 व्या फेरीत 22 हजार 775 मतांची आघाडी घेत शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे यांना मागे टाकलेले आहे. घनसावंगी येथे शिवसेनेचे उढाण यांनी 5 हजार 607 मतांची आघाडी घेतली आहे.