परतूर : वंदेमातरम्ला १५० वर्ष पूर्ण झाल्याचा आम्हालाही अभिमान आहे. मात्र, वेगवेगळ्या मार्गाने भारत मातेला लुटणाऱ्या भाजप वाल्यांना वंदेमातरम् बोलण्याचा अधिकार नाही. जे स्वतःचा पक्ष आत्मनिर्भर करु शकत नाहीत, ते काय भारताला आत्मनिर्भर करणार, असा सवाल उपस्थित करतानाच उध्दव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने केलेली मदत अतिशय तुटपुंजी असल्याचे सांगितले. परतूर तालुक्यातील पाटोदा माव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकात खैरे, खासदार संजय जाधव, जिल्हाप्रमुख महेश नळगे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पाटोदा येथील संजय खवल, ताराबाई हरदास, पांडुरंग बोनगे या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समक्ष आपल्या व्यथा मांडल्या. जानेवारी पासून आतापर्यंत जवळपास १ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, या शेतकरी आत्महत्यांचे हे पाप केवळ सरकारचे असल्याचा आरोप यावेळी ठाकरे यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जोपर्यंत ५० हजार रुपये हेक्टरी मदत सरकार घोषित करीत नाही, तोपर्यंत भाजपा युतीला मत नाही, असे फलक गावोगावी लावा, असे आवाहन करून ठाकरे पुढे म्हणाले की, अन्यायाच्या विरोधात शेतकऱ्यांनी सरकारवर धावून जाण्याची ही वेळ आहे. ही वेळ रडत बसण्याची नाही तर लढण्याची असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर अल्पावधीत आपल्या कामाच्या माध्यमातून जिल्ह्यात शिवसेनेचा झंझावात निर्माण केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख महेश नळगे याचे जाहीरपणे कौतूक केले. शिवसेनेची मुळे मजबूत असल्याने गावखेड्यातल्या तरुणांचे पाठबळ असल्याने शिवसेनेला कुणीही संपवू शकत नाही, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. संकट काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारच्या विरोधात रूम्हणे हातात घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले, तीन तिघाडा आणि काम बिघाडा असे राज्यातील महायुतीचे सरकार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव द्या, तुमच्या कुठल्याच पॅकेजची किंवा मदतीची आम्हाला गरज नाही. पाटोदा सर्कल मधील अनेक गावातील शेतकऱ्यांसह शिवसेनेचे
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.