खामगाव : खामगाव ते पिंपळगाव राजा रस्त्याचे काम अत्यंत कासव गतीने सुरू असून या अपूर्ण रस्ता कामाचा आणखी एक बळी गेला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 15 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान पिंपळगाव राजा ते घाटपुरी मार्गावरील फिल्टर जवळ उघडकीस आली.

खामगाव ते पिंपळगाव राजा या रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यापासून सुरू असून संबंधित कंत्राटदाराकडून दोन्ही बाजूचा रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे. सदर मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागत असून दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. नुकतेच शहरातील एका किराणा व्यावसायिकाला मालवाहू वाहनाने चिरडल्याची घटना ताजी असतानाच 15 जून रोजी सायंकाळी मोताळा तालुक्यातील गुळवेली गावातील रहिवासी संतोष जनार्दन सुरोशे (50) हे मोटरसायकल क्रमांक एमएच २८- ५५४९ ने जात असतांना अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक देऊन त्यांना चिरडल्याची घटना उघडकीस आली. अपघातानंतर सदर वाहन घटनास्थळावरून पसार झाले असून नागरिकांनी सदर इसमाचे मृतदेह रुग्णवाहिका बोलावून येथील सामान्य रुग्णालयांमध्ये पाठविले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वृत्तलिहेपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.