Bhimsagar surges over Chaityabhoomi: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती.
मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि भेदभावाच्या विरोधात महत्वपूर्ण सुधारणा घडल्या असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यपाल राधाकृष्णन संबोधीत करीत होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर भीमसागर उसळला. कार्यक्रमास व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, राजकुमार बडोले, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, संजय बनसोडे, कालिदास कोळंबकर, अमोल मिटकरी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदी उपस्थित होते. राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, बाबासाहेब जातीयवादापासून मुक्त राष्ट्र पाहू इच्छित होते, जिथे प्रत्येक व्यक्तीला शिक्षण आणि विकासाची समान संधी मिळेल. दारिद्र्य, असमानता यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षणात आहे, हे आपण जाणतो. शिक्षणाच्या विचारांना बळ देणाऱ्या डॉ. आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक देशभरातील विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातील विविध राज्यांतूनही अनुयायी येतात. त्यांचे अतूट प्रेम, आदर आणि शिस्तबद्ध आचरण खरोखरच प्रेरणादायी आहे.
देशाच्या प्रगतीचे श्रेय संविधानाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सध्या भारत जगात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. आपला देश सध्या विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. या प्रगतीचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाला आहे, असे प्रतिपादन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले.