dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जालन्यात बंजारा समाजाचा महामोर्चा; एसटी प्रवर्गात आरक्षण द्या;  नसता मुंबई जाम करू ! 

जालना : हैदराबाद स्टेट गॅझेटनुसार  बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती आणि सकल बंजारा समाजाच्या वतीने सोमवार, 15 सप्टेंबर रोजी जालना शहरात विराट महामोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने महिला व समाज बांधवांनी मोर्चात सहभाग नोंदवला. हैदराबाद  गॅझेट लागू करताना महाराष्ट्र शासनाने दुजाभाव करू नये, गॅझेटनुसार एक महिन्यात आरक्षणाचा लाभ द्या, अन्यथा मुंबईत घुसून मुंबई जाम करू, असा इशारा समाज बांधवांतर्फे यावेळी देण्यात आला. 

जालना : हैदराबाद स्टेट गॅझेटनुसार  बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती आणि सकल बंजारा समाजाच्या वतीने सोमवार, 15 सप्टेंबर रोजी जालना शहरात विराट महामोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने महिला व समाज बांधवांनी मोर्चात सहभाग नोंदवला. हैदराबाद  गॅझेट लागू करताना महाराष्ट्र शासनाने दुजाभाव करू नये, गॅझेटनुसार एक महिन्यात आरक्षणाचा लाभ द्या, अन्यथा मुंबईत घुसून मुंबई जाम करू, असा इशारा समाज बांधवांतर्फे यावेळी देण्यात आला. 

     आंध्रप्रदेश, तेलंगणाप्रमाणे बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी सकाळी 10 वाजता मस्तगड येथून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चासमोर रथांमध्ये बंजारा समाजातील राष्ट्रसंत सेवालाल महाराज, स्व. वसंतराव नाईक यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमा, बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणारे भजनी मंडळ, वाद्यवृंद, पारंपरिक वेशभूषेत महिला, समाजबांधव मागण्यांची फलके घेऊन सहभागी झाले. बंजारा समाजास एसटीचे आरक्षण लागू करा, लागू करा.., संत सेवालाल महाराज की जय.. वसंतराव नाईक यांचा विजय असो.. एक गोर..लाखो गोर…, आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही…, अशा  गगनभेदी घोषणा देऊन आंदोलकांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले. 

 गांधी चमन, शनी मंदिर, नूतन वसाहतमार्गे अंबड चौफुलीवर मोर्चाचे विराट सभेत रुपांतर झाले. चोहोबाजूंनी गर्दीने परिसर फुलून गेला. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. या वेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

   यावेळी माजी खा. हरिभाऊ राठोड, आ. राजेश राठोड, प्रा. संदेश चव्हाण, शरद राठोड ,उद्धव पवार, अर्जुन नायक,अविनाश चव्हाण, सुरेश पवार, मोहन आडे, भीमराव राठोड, संदीप जाधव, जिजाबाई जाधव, अंबिका जाधव, निलेश राठोड, राजू नाईक, प्रतिभा चव्हाण, आकाश जाधव, राजपाल राठोड, जयकुमार राठोड, विजय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन उध्दव पवार यांनी केले. गुलाब राठोड यांनी आभार मानले. 

या आहेत मागण्या

 महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाबाबत नुकताच हैदराबाद स्टेट गॅझेटचा आधार घेऊन जी.आर.काढला आहे. या पार्श्वभूमीवर बंजारा समाज हा हैदराबाद स्टेट गॅझेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडत असताना भाषावार प्रांत रचनेनंतर महाराष्ट्रात बंजारा समाजाचा विमुक्त जाती प्रवर्गात समावेश करण्यात आला. हा अन्याय दूर करून बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ द्यावा, हैद्राबाद गॅझेट लागू करावे, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या स्व.पवन चव्हाण यांच्या कुटुंबास शासनाने 10 लाख रुपये मदत द्यावी, त्यांच्या कुटुंबातील एकास शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.

 सर्व स्तरातून पाठिंबा 

बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात अंबड चौफुली येथे सभास्थळी मराठा समाजातील संघटना, धनगर समाज , भगवान सेवा संघ, कैकाडी समाज, जोशी- यज्ञेकर समाज, मजदूर संघसह विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला. 

 तगडा पोलिस बंदोबस्त

मोर्चासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेत मोठा फौजफाटा तैनात केला. उपविभागीय पोलीस अधिकारी हे स्वतः देखरेख अधिकारी म्हणून होते . 7 पोलीस निरीक्षक, 27 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 272 पोलीस अंमलदार, या सोबतच 02 दंगा नियंत्रण पथकातील 64 कर्मचारी असा मोठा लवाजमा तैनात करण्यात आला. स्वयंसेवकांनी प्रत्येक चौकात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीसांना मदत केली. 

क्षणचित्रे

» आरक्षणासाठी बंजारा समाज एकवटला

» अडीच तास अंबड चौफुली जाम

» वाहनांच्या लांबच लांब रांगा

» रिमझिम पावसात समाजबांधवांचा प्रचंड उत्साह

» पारंपरिक वेशात महिलांचा लक्षणीय सहभाग

» संस्था ,संघटनांतर्फे मोर्चे कऱ्यांना पाणी- चहाची व्यवस्था

» 500 युवक- युवती स्वयंसेवक

 » पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top