पुणे : दूध संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, साखर कारखाने, नागरी सहकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँकांच्या कामकाजाची इत्थंभूत माहिती असलेले अजितदादा हे ग्रामीण विकास व सहकार क्षेत्राचे चालते-बोलते ज्ञानकोश होते आणि त्याची कार्यपद्धती ही नव्या पिढीतील राजकीय नेतृत्वासाठी एका विद्यापीठाप्रमाणे आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला.

पुणे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराचे लोकनेते अजितदादा पवार नामकरण व पुतळ्याचे अनावरण
पुणे : दूध संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, साखर कारखाने, नागरी सहकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँकांच्या कामकाजाची इत्थंभूत माहिती असलेले अजितदादा हे ग्रामीण विकास व सहकार क्षेत्राचे चालते-बोलते ज्ञानकोश होते आणि त्याची कार्यपद्धती ही नव्या पिढीतील राजकीय नेतृत्वासाठी एका विद्यापीठाप्रमाणे आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला.
पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उभारण्यात आलेल्या लोकनेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला ¬‘अजितदादा पवार प्रवेशद्वार’ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर नेहरू मेमोरियल हॉल येथे आयोजित कार्यक्रमात शाह बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेआदी उपस्थित होते. अजितदादांच्या कार्याचे स्मरण करताना केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले, अजितदादा अखेरपर्यंत पुणे जिल्हा, बारामती आणि पिंपरी-चिंचवडच्या प्रश्नांसाठी आग्रही होते. सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतरही जमिनीशी नाळ जोडून ठेवणारे आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांशी बांधिलकी जपणारे त्यांच्यासारखे नेतृत्व दुर्मीळ असते. साखर कारखान्यांवरील प्राप्तिकराचा प्रश्न सोडविण्यासाठी अजितदादांनी सातत्याने पाठपुरावा केला. एखाद्या प्रश्नाचे महत्व ओळखून त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. कोविडच्या संकटकाळातील त्यांच्या कार्यतत्परता आणि नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुराव्यातून लोकांच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची आस्था आणि जबाबदारीची जाणीव दिसून येते.
अजितदादांच्या अपघाताचे सत्य जनतेसमोर येऊ द्या : फडणवीस
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला, यामागे काही घातपात आहे का, याची सत्यता जनतेसमोर आली पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा. त्यात कोणी दोषी आढळल्यास त्यांना फासावर लटकवता आले पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. फडणवीस म्हणाले, अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून आणखी मोठ्या कामांची अपेक्षा होती. त्यांच्या आठवणींनी मनात आनंद निर्माण होतो; मात्र ते आज आपल्यात नाहीत, याची वेदनाही आहे. पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन त्यांचा पुतळा उभारला आणि प्रवेशद्वाराला त्यांचे नाव दिले, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
अजितदादा पुणे जिल्ह्याचा विकासाचे शिल्पकार : शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दिवंगत अजितदादांचे पुणे आणि बारामतीशी राजकारणापलीकडचे जिव्हाळ्याचे नाते होते. आमदार, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. सहकार क्षेत्राचाही त्यांना दांडगा अनुभव होता. साखर कारखाने अडचणीत असताना त्यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारने साखर कारखान्यांवरील प्राप्तिकर माफ करण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासात अजितदादांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना पुणे जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेले प्रकल्प पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे शिंदे म्हणाले.
अजितदादांच्या स्वप्नांचा प्रवास सर्वजण पूर्ण करू : सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, लोकनेते अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण होत असलेला आजचा क्षण अत्यंत भावनिक आहे. ज्या पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी आयुष्य वेचले, त्याच जिल्हा परिषदेच्या प्रांगणात त्यांचा पुतळा उभारला जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील छोट्या गावांपर्यंत त्यांच्याविषयी असलेले प्रेम हेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे खरे प्रमाणपत्र आहे. अजितदादांचा विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.


