जालना : जालना शहरातील गांधीनगर भागातील चामड्याचा व्यापार करणार्या एका मोठ्या व्यापाऱ्याच्या घरी राष्ट्रीय तपास संस्था ( एनआयए ) व दहशतवाद विरोधी पथकाने ( एटीएस ) संयुक्तपणे छापेमारी केली. या कारवाईत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई करण्यासाठी ही दोन्ही पथके शनिवार, 5 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजेपासून या भागात पोहोचले होते. दरम्यान, या पथकाने छत्रपती संभाजीनगरातही कारवाई करून दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

जालना, छत्रपती संभाजीनगर तसेच मालेगाव येथे काही जण देश विघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती दिल्लीतील एनआयए, एटीएसच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार या दोन्ही पथकांनी संयुक्तपणे दोन्ही शहरात शनिवारी पहाटे 3 वाजेपासून छापे टाकण्यास सुरुवात केली. जालना शहरातील गांधीनगर येथून एकाला, छत्रपती संभाजीनगर शहरातील आझाद चौक येथून एकाला तर एन – 6 परिसरातून तिसऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. जालना येथून शेख नदीम समद सौदागर याला ताब्यात घेण्यात आले असून तो ‘जैश – ए – मोहंमद’ संघटनेचा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी गांधीनगर भागामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
