वाशिम : रिसोड तालुक्यातील रिठद परिसरात १७ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर आडोळ उपनदीला मोठा पूर आला. त्यामुळे १८ सप्टेंबर रोजी सकाळी रिठद गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला. गावातून रिसोड–वाशिमला जोडणाऱ्या छोट्या पुलावर तर रिठद–खंडाळा मार्गावरील मोठ्या पुलावरूनही पाणी वाहत होते. परिणामी गावकऱ्यांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले. नदीकाठच्या शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतपिकांचे नुकसान झाले.

१५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेल्या तुफानी पावसामुळे रिठद महसूल मंडळात थैमान घातले. तीन ते चार दिवसाच्या सततच्या पावसामुळे शेतांतील पिके पुन्हा पाण्याखाली गेली आहेत. यंदा शेतकऱ्यांनी काही ठिकाणी तीन ते चार वेळा खरिपाची पेरणी केली, मात्र अतिवृष्टी आणि पुरामुळे बियाणे वाहून गेले, पिकांची वाढ खुंटली किंवा पिकं जळून गेली. नदी–नाल्यांच्या काठावरील जमिनी खरडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. रिसोड तालुक्यातील विद्यमान परिस्थितीचा विचार करून ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
अनेक वर्षांची दुर्लक्षित मागणी
रिठद गावकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पूल उंचावण्याची मागणी प्रशासनासमोर सातत्याने लावून धरली आहे. मात्र दरवेळी आश्वासने दिली गेली, पण प्रत्यक्षात कामाचा मुहूर्त लागलाच नाही. परिणामी दर पावसाळ्यात आडोळ नदीला पूर येतो आणि पाणी पुलावरून वाहू लागले की गावकऱ्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. या काळात शाळकरी मुलांना शिक्षणासाठी जाणे अवघड होते, तर आजारी रुग्णांना वेळेत उपचारासाठी नेणेही कठीण बनते. शेतकऱ्यांचे उत्पन्न, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन या सगळ्यावर याचा गंभीर परिणाम होतो.
वारंवारच्या पूरपरिस्थितीने आता हाता तोंडाशी आलेला घाससुद्धा मिळणार नाही, पीक उभं राहिलं नाही. खर्चाचं ओझं वाढतंय, पण हातात उत्पन्न नाही. हे वर्ष आमच्यासाठी निराशा आणि अस्वस्थतेचं ठरत आहे.
– विनोद आरू, शेतकरी