Accidental death of soldier: उन्हाळी सुट्ट्या घेऊन नातेवाईकांच्या भेटीसाठी आलेल्या सैनिकाचा शुक्रवारी (१२ एप्रिल) मध्यरात्री भोकरदन-जालना रस्त्यावरील केदारखेडा गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.
भोकरदन (जालना) : उन्हाळी सुट्ट्या घेऊन नातेवाईकांच्या भेटीसाठी आलेल्या सैनिकाचा शुक्रवारी (१२ एप्रिल) मध्यरात्री भोकरदन-जालना रस्त्यावरील केदारखेडा गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. गजानन वामन नवल (३५, रा.नवलवाडी ता.भोकरदन) असे मृत झालेल्या सैनिकाचे नाव आहे.
भोकरदन तालुक्यातील नवलवाडी येथील गजानन वामन नवल हे राजस्थान बॉर्डरवर भारतीय सैन्यामध्ये कार्यरत होते. दोन दिवसापूर्वी सुट्ट्या घेऊन गावाकडे आले होते. नातेवाईकांच्या भेटीगाठी घेऊन दुचाकीवर गावाकडे येत असताना भोकरदन-जालना रस्त्यावरील केदारखेडा गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेवून त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान आज शनिवारी (१३ एप्रिल) सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नवलवाडी येथे दुपारी 4 वाजता त्यांच्या मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील, आजोबा-आजी, एक लहान भाऊ असा परिवार आहे.