Accident on Samruddhi Highway : देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा समृद्धी महामार्गावर अपघात; दोन जण ठार

Accident on Samruddhi Highway

Accident on Samruddhi Highway : देवदर्शनासाठी यवतमाळ येथून शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांच्या खाजगी वाहनाचे टायर फुटले. त्यानंतर, वाहन उलटल्याने मागील वाहनाने धडक दिली. यामध्ये, दोन भाविक जागीच ठार झाले तर, ८ जण गंभीर जखमी झाले.

Accident on Samruddhi Highway
सिंदखेड राजा : देवदर्शनासाठी यवतमाळ येथून शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांच्या खाजगी वाहनाचे टायर फुटले. त्यानंतर, वाहन उलटल्याने मागील वाहनाने धडक दिली. यामध्ये, दोन भाविक जागीच ठार झाले तर, ८ जण गंभीर जखमी झाले. ही घटना सिंदखेड राजा पोलीस ठाणे हद्दीतील समृद्धी महामार्गावरील माळ सावरगांव शिवारात ८ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
यवतमाळ येथून काही भाविक देवदर्शनासाठी एम.एच. २५ आर ३५७९ क्रमांक असलेल्या क्रूझर कंपनीच्या चारचाकी वाहनाने शिर्डीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या समृद्धी महामार्गावरील माळ सावरगांव शिवारात वाहनाचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. वाहन वेगात असल्यामुळे दोन ते तीन वेळा उलटले. एवढेच नाही तर, पाठीमागून येणाऱ्या क्रेटा कंपनीच्या कारने देखील पाठीमागून धडक दिली. अचानकपणे अपघात झाल्याने वाहन चालकालाही समोरील वाहनाचा अंदाज लागला नाही. हा अपघात इतका भीषण होता की, क्रूझरचा काही भाग अक्षरशः चुराडा झाला आहे. या भीषण अपघातात क्रूझरमधील प्रवासी विद्याबाई साबळे (५५ वर्ष), मोतीराम बोरकर (६० वर्ष) दोघे रा. आसेगाव देवी ता. बाबुळगाव जि. यवतमाळ यांचा जागीच मृत्यू झाला आहे. क्रेटा कार मधील कोणालाही कुठल्या प्रकारची इजा झाली नाही.

३ गंभीर, १० किरकोळ जखमी

भावना रमेश राऊत (३०वर्ष), प्रतिभा अरुण वाघोडे (४५ वर्ष), मीराबाई गोटफोडे (६५ वर्ष) या तिघींना गंभीर गंभीर दुखापत झाली असून, महामार्गावरील रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने जालना येथे दाखल करण्यात आले. याशिवाय, क्रूझर चालक संतोष साखरकर (२८वर्ष), कमलाबाई जाधव (५५ वर्ष), सुशीला (५२वर्ष), मिराबाई राऊत (६०वर्ष), छायाबाई चव्हाण (६५ वर्ष), प्रमिला घाटोळ (६०वर्ष), भक्ती राऊत (५वर्ष), रमेश राऊत (४०वर्ष),बेबीबाई येलोत (६०वर्ष), मोतीराम बोरकर (६५वर्ष) सर्व रा. आसेगाव देवी ता. बाबुळगाव जि. यवतमाळ. हे प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

‘यांनी’ केले मदतकार्य

पीएसआय गजानन उज्जैनकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश जाधव व सिंदखेड राजाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप डोंगरे,विष्णू नागरे यांनी तात्काळ धाव घेऊन किरकोळ जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. महामार्ग पोलिसांनी मृतक व जखमींना वाहनाबाहेर काढले आणि वाहतूक सुरळीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »