मानोरा: दिवाळीच्या आनंदात विघ्न आणणारी घटना शुक्रवारी मानोरा शहरात घडली. संभाजीनगर परिसरातील मुकुंद पवार यांच्या राहत्या घरात सकाळी साडेअकराच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. काही क्षणांतच घरात धुराचे लोट पसरले आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.

स्फोटाचा आवाज एवढा जबरदस्त होता की, शेजारच्यांसह अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटात घरातील टीव्ही, फॅन, फर्निचर, कपडे आणि इतर संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली; मात्र लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच नगर पंचायत मानोराचे अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशामक कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ आणि सहानुभूतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करुन आर्थिक मदत मंजूर करावी, अशी अपेक्षा पवार कुटुंबाकडून व्यक्त करण्यात आली आहे.