पैठण : क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादानंतर मुलानेच जन्मदात्या वडिलांची हत्या करुन त्यांचा मृतदेह घरातच पुरुन ठेवल्याची धक्कादायक घटना शनिवार, 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पैठण तालुक्यातील कडेठाण या गावात उघडकीस आली. या घटनेमुळे पैठण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण बापूराव काळे (५८ वर्ष), रा. कडेठाण असे मयताचे नाव असून राम कल्याण काळे (२८ वर्ष), रा.कडेठाण असे वडिलांची हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. मयत कल्याण काळे हे पत्नी सुमन काळे आणि मुलगा राम काळे यांच्यासोबत राहत होते. तर त्यांचा मोठा मुलगा ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेला आहे. दहा दिवसापुर्वी कल्याण काळे आणि मुलगा राम काळे यांच्यात वाद झाला होता. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्यावर राम काळे याने वडिलांची हत्या करुन त्यांचा मृतदेह घराचत पुरुन ठेवला होता. मयताची पत्नी सुमन काळे ही भोळसर असल्याने तिने या घटनेची माहिती कोणाला दिली नाही. दरम्यान, काळे यांच्या घरातून कुजल्याचा वास येत असल्यामुळे या खुनाला शनिवारी वाचा फुटली.
या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, उपनिरिक्षक राम बारहाते यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महसूल कर्मचारी, फॉरेन्सिक पथक यांच्या उपस्थितीत घरात पुरून ठेवलेल्या मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढून घटनास्थळीच पंचनामा केला. पोलिसांनी आरोपी मुलगा राम काळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता किरकोळ कारणातून वाद निर्माण झाला व लथाबुक्यांच्या मारहाणीत कल्याण काळे यांचा मृत्यू झाला असल्याची कबुली दिली. याप्रकरणी राम काळे यांच्यविरुध्द पाचोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.