जालना : महानगरपालिकेच्या निकालानंतर जुना जालना भागातील प्रभाग क्रमांक १० मध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दोन राजकीय गटांच्या समर्थकांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीत १० ते १५ जण जखमी झाले. ही घटना शुक्रवार, १६ जानेवारी रोजी घडली.

जुना जालना भागातील मिलन चौक परिसरात काँग्रेसचे सय्यद रहीम आणि शिवसेनेचे शेख जावेद यांच्या समर्थकांमध्ये निकालानंतर वादाला तोंड फुटले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. मात्र काही वेळातच हा वाद लाठ्या-काठ्यांनी झालेल्या मारहाणीमध्ये रूपांतरित झाला. या दरम्यान दोन्ही गटांकडून दगडफेकही करण्यात आली.
या हिंसक संघर्षात चार ते पाच जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, एक ते दोन जणांवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेच्या वेळी परिसरात दोन्ही गटांचा मोठा जमाव जमा झाल्याने परिस्थिती अधिक चिघळली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.