dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लाचखोरीचे ग्रहण; लघु पाटबंधारे विभागाचा लाचखोर कार्यकारी अभियंता रंगेहाथ जेरबंद; खेळण्यातील खोट्या नोटाही स्वीकारल्या

जालना :  नवीन वर्ष प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सुशासनाचे संकल्प घेऊन सुरू झाले असतानाच जालना जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाला लाचखोरीचे ग्रहण लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संपादित जमिनीचा मोबदला जमा करून देणे तसेच गावठाणातील घराचा शासनाने मंजूर केलेला मावेजाचा चेक देण्यासाठी तब्बल सात लाख रुपयांची लाच मागणाऱ्या लघु पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातच सापळा रचून रंगेहाथ पकडले.

रोहित प्रल्हाद देशमुख ( ३५ ) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदाराची शेतजमीन पुनर्वसनासाठी शासनाने संपादित केली होती. त्यापोटी १ कोटी ८८ लाख ३६ हजार ९४ रुपये इतका मोबदला २९ जुलै २०२५ रोजी तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा झाला होता. मात्र हा चेक मिळवून देण्यासाठी तसेच गावठाणातील घराच्या मावेजाचा चेक देण्यासाठी अभियंता देशमुख याने सात लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तक्रारदाराने यापैकी चार लाख रुपये आधीच दिले होते. तर उर्वरित तीन लाखांसाठी सातत्याने तगादा लावला जात होता. एवढ्यावरच न थांबता, घराच्या मावेजाचा चेक देण्यासाठी तक्रारदाराकडून सहीचे दोन कोरे चेकही घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.

या सततच्या छळाला कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर १ जानेवारी रोजी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातच सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने टिफीन डब्यात दिलेले एक लाख रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने देशमुख याला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, या रकमेतील ५० हजार रुपये लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा असल्याने उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.

   कारवाईदरम्यान देशमुख याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून ७,९१० रुपये रोख, एक मोबाईल आणि मोबाईलचे एअरबड्स असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तीन दिवसांची पोलिस कोठडी

ही कारवाई पोलिस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, उपअधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली, पर्यवेक्षण अधिकारी बी. एस. जाधव, सहायक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे तसेच एसीबीच्या पथकाने केली. शुक्रवार, २ जानेवारी रोजी देशमुख याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top