वाशिम : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या चिया पिकाच्या खरेदीला ३१ डिसेंबर रोजी अधिकृत प्रारंभ झाला. यंदाच्या हंगामातील पहिल्याच लिलावात चियाला प्रतिक्विंटल २२ हजार रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नव्या चिया खरेदीचा शुभारंभ उत्साहात पार पडला.

या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव काकडे, संचालक राजूभाऊ चौधरी, संचालक हिराबाई जानेवाले, संचालक सुरेश भोयर तसेच व्यापारी प्रतिनिधी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. सभापती काकडे यांच्या हस्ते लिलाव प्रक्रियेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सभापती माधवराव काकडे यांनी सांगितले की, पोषणमूल्यांनी समृद्ध असलेल्या चिया पिकाला बाजारात वाढती मागणी आहे. गुणवत्तेनुसार शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, पारदर्शक लिलाव व्हावा व व्यवहार सुरळीत पार पडावा यासाठी बाजार समितीने आवश्यक व्यवस्था केली आहे. पहिल्याच दिवशी मिळालेला २२ हजारांचा दर हा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे.
‘आळीव’ला ७५०० प्रतीक्विंटल भाव
दरम्यान, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत‘आळीव’ या नव्या वाणाचीही खरेदी सुरू झाली. हा वाण चिवरा येथील शेतकरी रामप्रसाद शिरसागर यांनी त्यांच्या शेतात पिकविला होता. या आळीव वाणाला प्रतिक्विंटल ७,५०० रुपये दर मिळाल्याने या पिकाबाबत शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे.
बाजार समितीकडून स्वच्छता, अचूक वजनकाटा, पारदर्शक लिलाव व तत्काळ व्यवहार यांसारख्या सुविधा देण्यात येत असून, चिया व आळीव या दोन्ही पिकांना मिळालेल्या चांगल्या दरामुळे येत्या काळात बाजारात आवक वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.