शेतमालाच्या थप्प्यांनी मानोरा बाजार समिती कोंडली; शेतकऱ्यांसाठी शेड नाही, व्यापाऱ्यांसाठी मोकळे रान!

मानोरा : कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरामधील शेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेतमालाच्या थप्प्या अक्षरशः डोंगरासारख्या साठून राहिल्याने, विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा माल ठेवायलाही जागा उरलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांना आपला शेतमाल शेडबाहेर अडगळीत टाकण्याची नामुष्कीची वेळ आली आहे. या गंभीर प्रकाराकडे उपनिबंधक व बाजार समिती दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

बाजार समितीत हा प्रकार मागील दीड वर्षांपासून सातत्याने सुरू असताना, व्यापारी मात्र खरेदी केलेला माल उचलून नेत नसल्याचे चित्र आहे. आश्चर्य म्हणजे, व्यापाऱ्यांची ही मनमानी स्पष्टपणे दिसत असतानाही बाजार समिती प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे बाजार समिती शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी? असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.

सध्या तालुक्यात शेतमाल विक्रीचा हंगाम सुरू असून, शेतकरी मोठ्या आशेने आपला माल बाजार समितीत घेऊन येत आहेत. मात्र आधीच व्यापाऱ्यांच्या मालाच्या थप्प्यांनी शेड भरून गेल्याने शेतकऱ्यांना उन्हात-पावसात माल बाहेर ठेवावा लागत आहे. व्यापाऱ्यांचा साठा दिवसेंदिवस वाढत असताना बाजार समिती प्रशासनाचे मौन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरत आहे.

शेतकऱ्यांच्या हक्काच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल साठवून ठेवण्यास परवानगी देणे म्हणजे शेतकरी हिताला थेट धक्का देण्यासारखे आहे. त्यामुळे बाजार समितीने तात्काळ व्यापाऱ्यांना थप्प्या हटविण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.

बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य द्यावे, शेतकऱ्यांच्या राखीव शेडमध्ये साठवलेला माल तात्काळ हटवून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी  मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

बाजार समिती शेतकऱ्यांसाठी असते, व्यापाऱ्यांच्या गोदामासाठी नाही. आमचा माल बाहेर पडतो आणि व्यापाऱ्यांचा माल सुरक्षित शेडमध्ये राहतो, हे अन्यायकारक आहे.

– सुधाकर चौधरी, शेतकरी (आमगव्हाण)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »