जालना : जनसामान्यांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वारकरी संप्रदायाचे संस्कार प्रत्येकाच्या मनात रुजण्याची गरज द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी येथे प्रतिपादित केली.

जालना : जनसामान्यांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वारकरी संप्रदायाचे संस्कार प्रत्येकाच्या मनात रुजण्याची गरज द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी येथे प्रतिपादित केली.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून जालना एज्युकेशन सोसायटीतर्फे जेईएस महाविद्यालयात आयोजित वारकरी संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. आळंदी देवाची येथील हभप डॉ. नारायण महाराज जाधव यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे या साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. दासू वैद्य, प्रा. श्रीधर नांदेडकर, जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड,स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, आळंदी देवाची येथील हभप ॲड. यशोधन महाराज साखरे , हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर, प्रा. सतीश बडवे आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
यावेळी डॉ. लहवितकर म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे तर अखंड भारत देशाच्या सांस्कृतिक, वैचारिक जडणघडणीत वारकरी संप्रदायाची भुमिका मोलाची ठरली आहे. याच वारकरी संप्रदायाने जनसामान्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. संतवाणी ही देववाणी आहे. संत साहित्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. जगदगुरु तुकोबारांयांच्या गाथेमुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हे नाकारता येणार नाही. संत साहित्य हे जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
दृकश्राव्य प्रणालीद्वारे संमेलनाचे उद्घाटन करतांना हभप डॉ. नारायण महाराज जाधव यांनी संत विचार हे जगाला प्रेरक असल्याचे सांगून संत साहित्याचा प्रसार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री यांनी बोलतांना जालना शहरात आयोजित हे वारकरी संत साहित्य संमेलन म्हणजे आधुनिक विज्ञान व अध्यात्माचा संगम असल्याचे सांगितले. संताचे विचार समाजमनात पेलण्यासाठी हे वारकरी संत साहित्य संमेलन पोषक ठरेल, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक करताना संमेलनाचे कार्यवाह डॉ .यशवंत सोनुने यांनी वारकरी संत साहित्य संमेलनाच्या आयोजनाविषयी विस्तृत माहिती दिली.
संमेलनाध्यक्ष डॉ रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलित करून तसेच शंखनादाने या वारकरी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन विनोद जैतमहल यांनी केले. डॉ. राजेंद्र सोनवणे यांनी आभार मानले.
यावेळी किशोर महाराज तिवारी, बाबूराव व्यवहारे, प्रा. बसवराज कोरे, डॉ. रावसाहेब ढवळे, काॅ. अण्णा सावंत, शाहीर अप्पासाहेब उगले, ॲड. सोपान भांदरगे, डॉ.पद्मजा जाधव, विनीत सहानी डॉ. प्रभाकर शेळके, राजेंद्र वांजळे, सुलभा कुलकर्णी, मनीषा भोसले यांच्यासह वारकरी संत साहित्य संमेलनाचे पदाधिकारी, वारकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कीर्तनकाराला राष्ट्रीयत्वाचे भान असावे
कीर्तनकाराचा व्यासंग व्यापक, सखोल आणि नेमका असावा. तो निर्भीड, निर्भय आणि धैर्यवान असावा. वारकरी कीर्तनकाराला अगोदर आपल्या राष्ट्रीयत्वाचे स्पष्ट भान असले पाहिजे, तरच त्याची विश्वात्मक भूमिका सार्थ ठरेल. प्रत्येकाच्या मनात वारकरी संस्कार रुजण्याची गरज विषद करून राज्य शासनाने धुळखात पडलेल्या संतपिठाकडे लक्ष द्यावे, संततीर्थासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. लहवितकर यांनी केले.
