अमडापूर / मलकापूर पांग्रा (बुलढाणा) : सगळीकडे आनंदाचा उत्सव साजरा होत असतानाच जिल्ह्यातील तीन ठिकाणी भीषण अपघात घडला. समृद्धी महामार्गावरील मलकापूर पांग्राजवळ दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण जागीच ठार तर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना २२ ऑक्टोबर, बुधवारला उघडकीस आली. त्यापूर्वी २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी अमडापूर – चिखली मार्गावर टिप्परच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर सकाळी मोताळा येथे वीस फूट खोल दरीत कार कोसळल्याने पाच जण जखमी झाले.

अमडापूर / मलकापूर पांग्रा (बुलढाणा) : सगळीकडे आनंदाचा उत्सव साजरा होत असतानाच जिल्ह्यातील तीन ठिकाणी भीषण अपघात घडला. समृद्धी महामार्गावरील मलकापूर पांग्राजवळ दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण जागीच ठार तर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना २२ ऑक्टोबर, बुधवारला उघडकीस आली. त्यापूर्वी २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी अमडापूर – चिखली मार्गावर टिप्परच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर सकाळी मोताळा येथे वीस फूट खोल दरीत कार कोसळल्याने पाच जण जखमी झाले.
चाकाखाली आल्याने समृद्धीवर क्लिनरचा मृत्यू
मलकापूर पांग्रा : वेगवेगळ्या अपघातात एक जण जागीच ठार तर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर बुधवारी उघडकीस आली. यामध्ये, ट्रकचे टायर तपासत असताना क्लिनर चाकाखाली आल्याने तो जागीच ठार झाला. अन्य एका अपघातात भरधाव कार कंटेनरवर आदळल्याने महिला गंभीर जखमी झाली.
कोलकत्त्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या (क्र. डब्ल्यबी २५ एल ६२५६ ) ट्रकचा चालक अयुब अली मंडल (वय अंदाजे ३५, रा. पश्चिम बंगाल) हा चॅनल क्रमांक ३२१.३ वर वाहन थांबवून टायर तपासत असताना, त्याच ट्रकचा क्लिनर शाहरुला मंडल (रा. पश्चिम बंगाल) हा मागील टायरखाली येऊन जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे बिबी येथे हलवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. घटनास्थळी एपीआय संदीप इंगळे, पो.का. गणेश उबाळे, अरुण भुतेकर तसेच १०८ ॲम्बुलन्स चालक प्रदीप पडघान आणि डॉ. स्वप्नील सुसर हजर होते. तर दुसऱ्या घटनेत समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक २९८ वर कार (क्रमांक एमएच ०२ जीपी ११३०)ही मुंबईवरून नागपूरकडे जात असताना समोरील कंटेनर क्र. एमएच ४८ डीसी २१३७ ला मागून जोरदार धडक बसली. अपघातात कविता हुंगे (वय ५०) गंभीर जखमी झाली असून त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने सरकारी रुग्णालय, मेहकर येथे हलविण्यात आले होते.
टिप्परच्या धडकेत एक ठार!
अमडापूर : चिखली मार्गावरील महादेव मंदिराजवळ टिप्परच्या धडकेत मंगळवारी एकाचा मृत्यू झाला. विजय ओंकार गिरी (४५वर्ष) असे मृतकाचे नाव असून ते डोंगरखंडाळा येथील रहिवासी होते.
विजय गिरी हे (क्रमांक एमएच २८ ए ए ६०९४) दुचाकीने हिवरा आश्रमकडे जात असताना अमडापूरजवळील महादेव मंदिर परिसरात अज्ञात टिप्परने त्यांच्या वाहनास धडक दिली. धडक इतकी भीषण होती की विजय गिरी ट्रकखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला होता.
माहिती मिळताच अमडापूर येथील विजय केळोदे यांच्यासह तरूणांनी व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून पोलिसांनी रस्त्यावरची वाहतूक सुरळीत केली होती. विजय गिरी यांच्या पश्चात वृद्ध वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी आईचे ही निधन झाले आहे. या अपघाती निधनामुळे कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे.
दरीत कोसळली कार; पाच जण जखमी
बुलढाणा : गुजरातच्या बारडोली येथून बुलढाण्याच्या दिशेने येणारी कार दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवार, २१ ऑक्टोबर रोजी मोताळा येथील आयटीआय कॉलेजजवळ घडली. ऐन दिवाळीच्या दिवशी झालेल्या भीषण अपघातात पाच जण जखमी झाले.
अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे कार अनियंत्रित होवून रस्त्याच्या कडेला गेली. यानंतर, तब्बल वीस फूट खोल असलेल्या दरीत कोसळली, अशी प्राथमिक माहिती आहे. रमाबाई शाम वानखेडे (45वर्ष), निखिल शाम वानखेडे (16वर्ष), संदिप श्रीसाट(२६ वर्ष), नेहा शाम वानखेडे (17वर्ष), राहुल पाटिल (23वर्ष) अशी जखमींची नावे आहेत. यातील वानखेडे कुटुंब हे कामानिमित्त गुजरातमध्ये स्थायिक झाले आहेत. दिवाळीनिमित्त नातेवाईकाकडे चिखली येथे जात असताना हा अपघात घडला. जखमींवर बुलढाणा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की, जखमींपैकी दोघांच्या हाताला गंभीर दुखापत होवून फॅक्चर झाले आहे.
