जालना : राज्यातील 29 वी महानगरपालिका म्हणून दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या जालना शहर महानगरपालिकेचे पहिलेच आयुक्त ठरलेले संतोष खांडेकर हे 10 लाखांची लाच घेताना गुरुवार, 16 ऑक्टोबर रोजी रंगेहाथ पकडले गेले. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, शुक्रवारी त्यांना एसीबीने न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

संतोष खांडेकर यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत करण्यात आलेल्या झडतीमध्ये रोख रक्कम 5 लाख 20 हजार रुपये, 16 तोळे सोने आणि जवळपास अडीच किलो चांदी आढळून आली आहे. शहरातील कंत्राटदारांनी केलेल्या कामांचे बिल काढण्यासाठी आधी 40 लाख रुपये घेतल्यानंतर पुन्हा 20 लाखांची मागणी केली. तडजोडीअंती 10 लाख रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता ते रंगेहाथ पकडले गेले. राज्यातील 29 वी महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या जालना महानगरपालिकेचे पहिलेच आयुक्त म्हणून संतोष खांडेकर यांना संधी मिळाली होती. मात्र, त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि येथील नियुक्तीवर अनेकांची नाराजी होती. विशेष म्हणजे ते अनेक वर्षे नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून येथेच कार्यरत होते.मागील काही वर्षात जालना शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले. विविध विकासकामे झाली आहेत. या कामांचे बिल काढण्यासाठी ते कंत्राटदारांकडून 16 टक्के कमिशन घेतल्याशिवाय सही करीत नव्हते, अशी चर्चा गुरुवारी रात्री सुरू होती.
मनसेकडून जल्लोष
महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाचखोरीत पकडण्यात आल्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिकेसमोर फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. यावेळी मनसेचे राहुल रत्नपारखे, महेश नागवे, राम पाटोळे आदींची उपस्थिती होती.