आदिवासी समाजाचा मानोरा शहरात आरक्षण बचाव मोर्चा; एसटी आरक्षणात इतर समाजाच्या घुसखोरी विरोधात एल्गार  

मानोरा :  आदिवासी समाजाच्या भविष्याची चिंता करत, अनुसूचित जमातीतील (एसटी) हक्क अबाधित ठेवण्यासाठी आदिवासी समाज बांधवांनी २४ सप्टेंबर रोजी  मानोरा तहसील कचेरीवर  शक्तिशाली मोर्चा काढला.  शेकडो आदिवासी समाज बांधवांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला. यावेळी “आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बाप्पाचा! बिरसा मुंडा जिंदाबाद!” अशा जयघोषांनी शहर दुमदुमून गेले.

मानोरा :  आदिवासी समाजाच्या भविष्याची चिंता करत, अनुसूचित जमातीतील (एसटी) हक्क अबाधित ठेवण्यासाठी आदिवासी समाज बांधवांनी २४ सप्टेंबर रोजी  मानोरा तहसील कचेरीवर  शक्तिशाली मोर्चा काढला.  शेकडो आदिवासी समाज बांधवांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला. यावेळी “आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बाप्पाचा! बिरसा मुंडा जिंदाबाद!” अशा जयघोषांनी शहर दुमदुमून गेले.

आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सुपूर्द केले. निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, आदिवासी समाजाची भविष्यकालीन वाटचाल गंभीर संकटात आहे. बंजारा व धनगर समाजांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी मोर्चे, आंदोलन, उपोषण केले जात आहेत. हे प्रयत्न आदिवासी समाजाच्या हक्कावर अन्यायकारक आहेत. त्यामुळे इतर समाजांना एसटी आरक्षणात सहभागी करू नये, असा ठाम आग्रह निवेदनाद्वारे मांडण्यात आला.शहरातील प्रमुख मार्गाने निघालेला  मोर्चाम तहसील कार्यालयावर धडकला, तेथे सभा पार पडली. ज्येष्ठ नेते माजी पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे, माजी नियोजन अधिकारी डॉ. महादेवराव डाखोरे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष राम चव्हाण, सुभाष पवणे, माजी गटशिक्षण अधिकारी गणपतराव आव्हळे यांनी  सभेला  संबोधित केले. त्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले आणि आंदोलनात सहभाग घेणाऱ्यांना ऐक्य व धैर्य राखण्याचे प्रोत्साहन दिले. मोर्चाच्या वातावरणात आदिवासी समाजाच्या एकतेची भावना स्पष्टपणे जाणवून येत होती. उपस्थित बांधवांनी हक्कासाठी एकजूट दाखवली आणि आरक्षणाबाबत आपल्या ठाम मताचा संदेश शासनास दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय मस्के, सूत्रसंचालन किसन डफडे यांनी केले. आभार आनंद खुळे यांनी मानले.  

महिलांचा लक्षणीय सहभाग

मोर्चात आदिवासी समाजाच्या महिलांचा जोरदार सहभाग पाहायला मिळाला. हजारो महिलांनी विविध घोषवाक्ये असलेले फलक हातात घेऊन सक्रीय सहभाग नोंदविला. पिवळ्या झेंड्यांसह अंगावर पिवळी साडी परिधान केलेल्या महिलांच्या उपस्थितीने मानोरा शहरात जणू पिवळे वादळ घोंगावत होते. या महिलांनी आपल्या समाजाच्या हक्कासाठी पाठींबा दर्शविला आणि आदिवासी बांधवांच्या एकतेची मजबूत साक्ष दिली.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

मोर्चा सुरळीत आणि शांततेत पार पडावा यासाठी मानोरा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अधिकारी, जवान, आणि होमगार्डचे ताफे तैनात करण्यात आले. रस्त्यांवर आणि मोर्चाच्या मार्गावर पोलिसांनी दक्षतेने हालचाल नियंत्रित केली, कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये यावर भर दिला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »