धावडा : वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करीत काळविटाची अवैध शिकार आणि तस्करी करणाऱ्या एका जणाला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. जाफ्राबाद तालुक्यातील गारखेडा गावात ही कारवाई करण्यात आली.

धावडा : वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करीत काळविटाची अवैध शिकार आणि तस्करी करणाऱ्या एका जणाला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. जाफ्राबाद तालुक्यातील गारखेडा गावात ही कारवाई करण्यात आली.
वनविभागाने केलेल्या या कारवाईत आरोपीच्या घरातून काळविटाचे मांस, शिंगे आणि शिकार करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी नीता फुले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गारखेडा येथील रहिवासी संतोष विश्वनाथ काळे याच्या घरावर छापा टाकून वन्यप्राणी काळविटाचे मांस, ते ठेवण्यासाठी वापरलेला फ्रीज, शिंगे, नायलॉन जाळे, सुरी, चाकू, इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी संतोष काळे याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. जाफ्राबाद न्यायालयाने त्याला 3 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वनपरीक्षेत्र अधिकारी नीता फुले करत आहेत. या कारवाईत सहायक वनसंरक्षक एस.एन. मुंढे यांच्या नेतृत्वाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी एन.पी. फुले, वनपरिमंडळ अधिकारी वाय.एम. डोमळे, आर.डी. दुनगहु, वनरक्षक संभाजी हटकर, सुदाम राठोड, डि.व्ही. पवार, ए.व्ही. वरशीळ, व्ही.आर. नागरे, एन.ए. सोडगीर यांचा सहभाग आहे.
