वाशिम : समृद्धी महामार्गावरून २.४३ कोटी रुपयांच्या औषध चोरीचा तपास वाशिम पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडला. स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईतून मध्य प्रदेशातील सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ३८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाशिम : समृद्धी महामार्गावरून २.४३ कोटी रुपयांच्या औषध चोरीचा तपास वाशिम पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडला. स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईतून मध्य प्रदेशातील सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ३८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२३ जुलै २०२५ रोजी भिवंडी येथून औषध कंपनी अॅबोटचा कंटेनर (MH04JK7054) नागपूर, रायपूर, कटक व कोलकात्याकडे निघाला होता. प्रवासादरम्यान समृद्धी महामार्गावर अज्ञात चोरट्यांनी चालकाच्या नकळत कंटेनरचे तीन लॉक तोडून त्यातून औषधीचे ४६ बॉक्स चोरी केले. त्याची एकूण किंमत २ कोटी ४३ लाख ८६ हजार ६८४ रुपये होती. कंपनीकडून तपासानंतर ३० जुलै रोजी कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलला तपास सोपवण्यात आला. तपास पथकाने त्या दिवशी महामार्गावरून गेलेल्या वाहनांचा डेटा तपासून संशयित ट्रक शोधले. त्यानंतर पुणे, नाशिक, भिवंडी, इंदूर, देवास, उज्जैन अशा ठिकाणी गुप्त तपास सुरु झाला. दरम्यान, गणेशोत्सव पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की संशयित आरोपी पुन्हा चोरीसाठी ट्रक (MP09HH9829) घेऊन येत आहेत. पथकाने कारंजा परिसरात सापळा लावून आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक लॉक कटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले. चौकशीत मुख्य आरोपी राजेंद्र सादुलसिंग चौहान याच्यासह इतर साथीदारांचा सहभाग स्पष्ट झाला. देवास येथे छापा टाकून मुख्य आरोपी राजेंद्र सादुलसिंग चौहाण, अरविंद अनाबसिंग चौहाण, बुरा उर्फ कुलदीप भारत छाडी, कुणाल नरेश चौहाण, अंतिम कल्याण सिसोदिया, भारत घुडावद यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील स्कॉर्पिओ गाडी (MP09BC3739) देखील जप्त करण्यात आली. या धाडसी कारवाईबद्दल वाशिम पोलिसांचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल व कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केली.
८५ हजार वाहनांचा डेटा तपासून सुगावा
जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलने ८५ हजार वाहनांचा डेटा तपासून संशयित ट्रक ओळखले. पुणे, नाशिक, भिवंडी, इंदूर, देवास आणि उज्जैनमध्ये गुप्त तपास सुरु झाला. गणेशोत्सव पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीवरून कारंजा परिसरात सापळा लावून आरोपींना जेरबंद केले.
मध्य प्रदेशातील सराईत टोळीचा पर्दाफाश
चौकशीत आरोपींनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात राज्यांमध्ये अशाच प्रकारच्या चोरी केल्याचे कबूल केले आहे. या कारवाईत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना कारंजा येथील न्यायालयाने १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास सपोनि संतोष इंगळे हे करत असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
