माहोरा : मोटारसायकलच्या धडकेत व्यायाम करून घरी परतणाऱ्या माहोरा येथील एका डॉक्टरचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना धाड रोडवर दळवी बारजवळ घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

माहोरा : मोटारसायकलच्या धडकेत व्यायाम करून घरी परतणाऱ्या माहोरा येथील एका डॉक्टरचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना धाड रोडवर दळवी बारजवळ घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. रवींद्र संपतराव कासोद (58 वर्ष), रा. माहोरा, ता. जाफ्राबाद, जिल्हा. जालना असे या घटनेत मरण पावलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:45 वाजता डॉ. कासोद व्यायाम करून घरी परतत असताना, दळवी बार, धाड रोड जवळून येणाऱ्या एका मोटारसायकलस्वाराने त्यांच्या मोटारीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या डॉ. कासोद यांना तातडीने जाफ्राबाद येथील डॉ. देशमुख यांचेकडे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच मध्यरात्री 1 वाजता त्यांचे निधन झाले.
डॉ. कासोद यांच्या पश्चात पत्नी वैशाली कासोद ( माहोरा सरपंच), मोठी मुलगी डॉ. मृणाली पोपळे-कासोद (वैद्यकीय अधिकारी, भोकरदन ग्रामीण रुग्णालय), छोटी मुलगी मोक्षदा कासोद (घोटी, नाशिक येथे डीटीएस अभ्यासक्रम), दोन भाऊ –वकील विजय कासोद व डॉ. प्रदीप कासोद, दोन बहिणी, जावई व नातेवाईक असा मोठा परिवार आहे.
डॉ. कासोद यांनी आयुष्यभर वैद्यकीय क्षेत्रासोबत शैक्षणिक संस्था, पतसंस्था, तसेच सामाजिक व राजकीय कार्यातही मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे माहोरा तसेच संपूर्ण जाफ्राबाद तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शनिवार, 23 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता माहोरा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शनिवारी दिवसभर माहोरा व परिसरातील बाजारपेठ व्यापाऱ्यांनी स्वेच्छेने दुकाने बंद ठेवून डॉ. कासोद यांना श्रद्धांजली वाहिली. डॉ. कासोद यांचे व्यक्तिमत्व हे समाजातील सर्वच क्षेत्राशी घट्ट जोडलेले होते. त्यांच्या निधनाने माहोरा गावासह जाफ्राबाद तालुक्याच्या प्रगतिपथावर काम करणारा एक जिद्दी, संवेदनशील व समाजाभिमुख नेता गमावला आहे, अशी भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
