Annabhau Sathe birth anniversary  : ‘दगडाने पांघरली वस्त्रे, आम्ही उघडेच राहिलो..’; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कविसंमेलन रंगले

Annabhau Sathe birth anniversary

Annabhau Sathe birth anniversary  : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरातील नागसेन ग्रंथालयात आयोजित कविसंमेलन उपस्थित कवींच्या बहारदार काव्यरचनांनी चांगलेच रंगले. रविवार, 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ही काव्यमैफल सजली.

Annabhau Sathe birth anniversary

जालना :  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरातील नागसेन ग्रंथालयात आयोजित कविसंमेलन उपस्थित कवींच्या बहारदार काव्यरचनांनी चांगलेच रंगले. रविवार, 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ही काव्यमैफल सजली.

या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक राम गायकवाड हे होते. यावेळी अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डी.बी. जगतपुरिया, नागसेन ग्रंथालयाचे अध्यक्ष राजेश राऊत, ज्येष्ठ विचारवंत डॉ. विजय कुमठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कवी प्रा. अशोक खेडकर यांनी सादर केलेल्या

‘ गेला काळ पुढे जरी, आम्ही तिथेच राहिलो,
दगडाने पांघरली वस्त्रे,
आम्ही उघडेच राहिलो..’

या गजलेने रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. ज्येष्ठ गझलकार सुनील लोणकर यांनी ‘ गुरुजी खरंच,शाळा सुटल्यावर मी बेछूट झालो.. ही रचना सादर केली. डॉ. प्रभाकर शेळके यांनी गायलेल्या ‘अशी छक्कड लावणी मैना गावावर राहिली मुंबईच्या काळजाची कशी जीवाची काहेली’, या रचनेला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. मनीष पाटील यांनी ‘ हल्ली तो एकटाच जागत असतो रात्रभर..’ ही रचना सादर केली. शिवाजी तेलंगे यांनी ‘ नवीन एक सूर्य असावा, नवीन एक चंद्र असावा..’ ही कविता सादर केली. कवी दिनेश शेळके यांनी ‘अण्णाभाऊ तुम्ही कामगारांची, कष्टकऱ्यांची खरी ओळख आहात..’ ही कविता ठेवली. आबासाहेब म्हस्के यांनी ‘ काय फरक पडतो सोशल मीडियावर सतत टिवटिव करण्यात, काय घंटा फरक पडतो गेंड्याची कातडी घातलेल्या लोकांना..’ ही विद्रोही रचना सादर केली. तर भीम सूर्याचा किरण तू, शब्दात विद्रोह पेरत गेलास…’ ही अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची महती सांगणारी रचना प्रदीप घाटेशाही रचना सादर केली. कवी सुहास पोतदार यांनी ‘ कुठल्याच कबरीत तारीख गाडलेली नाही, इतिहास सारा शूर बेइमानांनी लिहिला आहे..’ ही विद्रोह करणारी रचना सादर केली.  ‘ हे माय काय सांगू तुला जग सारे बदललंय..’ ही कवी सर्जेराव खरात यांनी कविता सादर केली. कवी कैलास भाले यांनी सादर केलेल्या’  मी दिवसभर ध्वजासारखा फडफडून तडफडत राहतो मांगवाडयावर आणि सायंकाळी शाळेचा झेंडा उतरवून परत घरी येतो रानांत वासरू हरवलेल्या गाईसारखा व्याकूळ..’ रचनेने रसिकांना अंतर्मुख केले. तर कवी किशोर भालेराव यांनी सादर केलेली
‘ तुमच्या दीड दिवसावर अनेकांनी पीएचड्या केल्या. त्यांच्या माथ्यावर डॉ. म्हणून पदवी शोभून दिसू रायली, पण आमच्यासारखे बेरोजगार अजूनही भाकरीच्या गोलातून बाहेर पडले नाही, त्याचे काय?
अशा शब्दात व्यवस्थेला प्रश्न विचारणारी धारदार रचना सादर केली. यावेळी कवी रेखा गतखणे, कांचन थोरवे, समाधान खाडे, डॉ. राज रणधीर, लक्ष्मीकांत दाभाडकर यांनीही बहारदार रचना सादर केल्या.
यावेळी साहित्यिक डी.बी. जगतपुरिया विज्ञानवाद अंगिकारावा याबाबत एक रचना सादर करीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राम गायकवाड यांनीही एक कविता सादर केली. डॉ. विजय कुमठेकर यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक राजेश राऊत यांनी केले. सूत्रसंचालन कवी प्रा. पंढरीनाथ सारके यांनी केले. कवी कैलास भाले यांनी आभार मानले.

 निसर्गनियम, पर्यावरणावरही रचना

या कवी संमेलनात कवी गणेश खरात यांनी माणसांना निसर्ग नियमांची आठवण करून देणारी ‘ पाखरं, गुरंढोरं निसर्गाने उपजत घालून दिलेला जगण्याचा धर्म पाळतात, अन् बुद्धिजीवी माणसं मात्र मेंदूमध्ये धर्माला पेटवून रस्त्यावर होळी खेळतात..’ रचना सादर केली. तर पत्रकार कवी विनोद काळे यांनी ‘ चंगळवादी संस्कृतीचे इथे सोहळे दाटले, वसाहतवादी माणसाने निसर्गालाच लुटले..’ ही अस्वस्थ पर्यावरणाबाबतची रचना सादर केली. यावेळी रसिकांनी या रचनांना उत्स्फूर्त दाद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »