जालना : येथील निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये व्यवस्थापकाने विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिसात रविवार, 27 जुलै रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रात्रीच पोलिसांनी संशयित आरोपी प्रमोद खरात याला ताब्यात घेतले आहे. याबाबत सोमवारी उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माहिती दिली.

जालना शहरातील महानगरपालिकेच्या शेजारी जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरात निवासी क्रीडा प्रबोधिनी मुलींचे वस्तीगृह आहे. या वसतिगृहातील भौतिक सुविधांसह वसतिगृह व्यवस्थापकाच्या कारभाराबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या.
या तक्रारीच्या अनुषंगाने जालना पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांनी महिला केंद्रप्रमुख सुजाता भालेराव यांच्यासह दोन दिवसांपूर्वी वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी अनेक मुलींनी व्यवस्थापक प्रमोद खरात याच्याकडून होत असलेल्या गैरवर्तनाच्या गंभीर तक्रारीचा पाढाच वाचला. मुलींसोबत वारंवार अश्लील वर्तन करणाऱ्या खरात याच्यासंदर्भातील तक्रारीची गंभीर दखल घेत रविवार, 27 जुलै
रोजी रात्री गटशिक्षण अधिकारी मनोज कोल्हे यांनी कदीम जालना पोलिसात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी प्रमोद खरात याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 74, 75, पोस्को कायदा 8, 10, 12 आणि बालन्याय अधिनियम 75 कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला रात्रीच अटक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव करीत आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली.