Buldhana First in Majhi Vasundhara Abhiyan: बुलडाणा पालिकेने शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा 4.0 अभियानात अमरावती विभागातून सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक पटकावण्याचा विक्रम रचला आहे.
बुलडाणा : बुलडाणा नगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात आले आहे. नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून केलेल्या या कामामुळे बुलडाणा पालिकेने शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा 4.0 अभियानात अमरावती विभागातून सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक पटकावण्याचा विक्रम रचला आहे.
राज्यशासनाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान हा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांसाठी सुरु केलेला आहे. या मध्ये पर्यावरणाच्या संवर्धनासाठी निसर्गाच्या पंच तत्वांवर आधारित सदर उपक्रम आहे. या अभियानाची सुरुवात ही २ ऑक्टोबर , २०२० रोजी पर्यटन, पर्यावरण आणि वातावरणी बदल विभाग यांच्या वतीने प्रारंभ करण्यात आली आहे. हा सदर अभियानाचा चौथ्या टप्पा आहे. या अभियानात बुलडाणा नगरपालिका पहिल्या टप्यापासून सहभागी असून सलग चौथ्या वर्षी देखील बुलडाणा पालिकेला प्रथम क्रमांक प्रदान करण्यात आला आहे. या अभियानात विभागीय पातळीवर द्वितीय पुरस्कार हा वणी नगरपालिकेला प्रदान करण्यात आला आहे, तर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार हा अंजनगाव नगरपालिकेला जाहिर करण्यात आला आहे.
असे आहे मू्ल्यमापनाचे स्वरुप
या योजने अंतर्गत वर्षभर काम केले जाते. याची माहिती ही माझी वसुंधरा या पोर्टलवर छायाचित्रणासह अपलोड करणे आवश्यक असते. त्यानंतर वर्षभरातील कामाचा आढावा घेवून त्याचा अहवाल तयार केला जातो.हा अहवाल ऑनलाईन पध्दतीने पोर्टलवर उपलब्ध केला जातो. त्यानंतर या कामाचे मुल्यमापन केले जाते. सदर काम हे त्रयस्थ संस्थेच्यावतीने केले जाते.
शहर विकासासाठी मिळणार 75 लाख
शासनाच्या या माझी वसुंधरा अभियानात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या नगरपालिकेला शासनाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी 75 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सदर निधी हा पर्यावरणाशी संबंधित कामावरच खर्च करावा लागणार असल्याने शहराचे सौदर्य करण आणखी खुलणार आहे.
बुलडाणा शहराला पुन्हा ओळख मिळावी यासाठी प्रयत्न
माझी सुंदरा 4.0 अंतर्गत मिळालेली रक्कम हरित पट्टे विकास आणि पर्यावरण पूरक कामासाठी शासन निर्णयानुसार खर्च करावे लागणार आहे. पुरस्काराच्या रकमेतून हरित पट्टे विकसित करून बुलडाणा शहराचे थंड हवेचे ठिकाण म्हणून असलेली ओळख पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सदर पुरस्कारासाठी नगर परिषदेचे खूप खूप अभिनंदन.
– आ. संजय गायकवाड बुलडाणासर्वांच्या प्रयत्नातून यश मिळाले
मुख्यमंत्री सक्षम शहर योजना आणि आता माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत परत एकदा अमरावती विभागातून बुलडाणा नगर परिषदेचा प्रथम क्रमांक आला आहे. हा पुरस्कार आ. संजय गायकवाड व जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शन तसेच नगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नाने शक्य झाले.
-गणेश पांडे, मुख्याधिकारी बुलडाणा