Chhatrapati Sambhajinagar news: सिल्लोड तालुक्यातील बाभूळगाव बु.येथून सोमवार ६ मे रोजी पहाटे गोठ्याची कुलूप तोडून दोन शेळीच्या पिल्लांची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली.
बनकिन्होळा : सिल्लोड तालुक्यातील बाभूळगाव बु.येथून सोमवार ६ मे रोजी पहाटे गोठ्याची कुलूप तोडून दोन शेळीच्या पिल्लांची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अधिक माहिती अशी की, बाभूळगाव बु.शिवारातील गट नंबर १०० मध्ये शेतकरी कारभारी रंगनाथ फरकाडे यांचा जनावरांचा गोठा आहे. या गोठ्याची अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून गोठ्यातून दोन शेळीची पिल्ले चोरून नेल्याची घटना घडली आहे. शेतकरी कारभारी फरकाडे यांनी नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी गाय, बैल, शेळ्या व शेळीच्या पिल्लाना चारापाणी करून गोठ्यामध्ये बांधून घरी आले होते. दुसऱ्या दिवशी सोमवार ६ मे रोजी पहाटे पाच वाजता कारभारी फरकाडे हे शेतामध्ये जनावरांना चारापाणी करण्यासाठी गेले असता. त्यांना गोठ्याची कुलूप तोडलेली दिसले. त्यांनी गोठ्यामध्ये जाऊन बघितले तर गोठ्यामध्ये बांधलेले दोन शेळीच्या पिल्ले चोरीला गेल्याचे लक्षात आले. यात कारभारी फरकाडे यांचे १० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. बाभूळगाव बु.येथून सोमवारी मध्यरात्री गोठ्याची कुलूप तोडून चोरट्यांनी शेळीचे दोन पिल्ले चोरीला गेल्याने परिसरातील पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तरी या परिसरात रात्रीचा पोलिसचा गस्त वाढवण्यात यावा अशी मागणी परिसरातील पशुपालक व शेतकऱ्यांमधुन होत आहे.
पोलिसांना चोरट्यांचे मोठे आव्हान
वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून, पोलिसांना चोरट्यांनी मोठे आव्हान दिले आहे. वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील बाभूळगाव बू.येथून शेतकरी कारभारी फरकाडे यांच्या गोठ्यातून सोमवारी मध्यरात्री दोन शेळीचे पिल्ले अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. तर दुसरी घटना निल्लोड येथून गजानन लवंगे यांच्या घरासमोर बांधलेल्या चार शेळ्या व त्यांची तीन पिल्ले अशा एकून छोट्यामोठ्या सात शेळ्या चोरट्यांनी शुक्रवार ३ मे रोजी मध्यरात्री चोरून नेल्या आहेत. विशेष म्हणजे वडोदबाजार पालीस ठाणे हद्दीत यापुर्वीही शेळ्या,बैलजोड्या आदी जनावरे चोरीस गेलेली आहेत.हे चोरीचे सत्र सुरूच असल्याने शेतकरी व पशुपालकांची चांगलीच झोप उडाली आहे.