Robbery at Kolte Takli: परिसरातील कोलते टाकळी येथे 14 रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी धारदार चाकूचा धाक दाखवून दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याप्रकरणी दोन चोरट्यांना पकडण्यात वडोद बाजार पोलिसांना यश आले आहे.
वडोद बाजार (छत्रपती संभाजीनगर) : परिसरातील कोलते टाकळी येथे 14 रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी धारदार चाकूचा धाक दाखवून दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याप्रकरणी दोन चोरट्यांना पकडण्यात वडोद बाजार पोलिसांना यश आले आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखत उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे पुढील तपास करीत आहेत.
कोलते टाकळी येथीर रहिवासी प्रभाकर तुकाराम कोलते हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत 13 एप्रिल रोजी जेवण करुन घरातील समोरच्या खोलीमध्ये झोपलेले होते. 14 एप्रिल रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घरामध्ये भांड्याचा आवाज आल्याने ते जागी झाले. त्यांच्या जवळ तोडाला मास्क बांधलेले दोन व्यक्ती आले, त्यातील एकाने कोलते यांचे पाठीमागून हात धरले आणि एकाने गळ्याला चाकू लावून मारहाण केली. हा सगळा प्रकार पाहून कोलते यांची पत्नी घाबरल्याने घरातील त्या लपून बसल्या. याच दरम्यान तिसऱ्या चोरट्याने घरातील कपाटाचा लॉक तोडून कपाटामध्ये ठेवलेले दागिन्याचे पाकीट काढले आणि पसार झाले. याप्रकारानंतर कोतले कुटुंबीयांनी आरडाओरड केली. तेव्हा शेजारी जागा झाले आणि त्यांनी चोरांच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही.
या दागिन्यावर मारला होता चोरट्याने डल्ला
चोरट्याने चाकूच्या धाकावर घरातील 60 हजार रुपये किंमतीची गहू मन्याची पोत, 44 हजार रुपये किंमतीचे एकदानी, चार हजार रुपये किंमतीची नथ, रोख दहा हजार रुपये असा एकूण एक लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते.
असा लावला चोरट्यांचा छडा
घटनेनंतर काही वेळानंतर रिधोरा येथील गावकऱ्यांनी एका संशयीतास पकडल्याची माहीती मिळाली. कोलते यांनी तेथे जावून पाहिले असता घरात चोरी करण्यासाठी आलेल्यास त्यांनी ओळखले. याप्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात माहिती दिली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी हजर झाले. ताब्यात घेतलेल्या संशयीतास नाव विचारले असता त्यांने बंटी टाबर चव्हाण (रा. मारोळा, ता. पैठण. जि. छत्रपती संभाजीनगर) असे असल्याचे सांगितले. तसेच त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे साथीदाराचे नाव विशाल टाबर चव्हाण, सावरदा टाबर चव्हाण (दोन्ही रा. चितेगाव, ता. पैठाम जि. छत्रपती संभाजीनगर) असे असल्याचे सागितले. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आणखी आरोपीचा पोलीस शोध सुरू आहे.