Firing in the air in broad daylight in Malkapur: भर दुपारी रस्त्याने पळ काढत अज्ञातांनी हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी पाच वाजताच्या सुमारास मलकापूर शहरातील रामवाडी भागात घडली.
मलकापूर: दुपारी रस्त्याने पळ काढत अज्ञातांनी हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी पाच वाजताच्या सुमारास मलकापूर शहरातील रामवाडी भागात घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेचा तपास मलकापूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल गोपाळ करीत आहेत.
रविवार ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास स्थानिक रेल्वे स्टेशनवर गंगानगर एक्सप्रेस फलाट नंबर एक वर आली. याच दरम्यान फलाटावर बसलेल्या तिघांनी एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आरफीएफचे जवानही तेथे धावून गेले. यावेळी तिघांनी रेल्वे स्टेशनच्या संरक्षण भिंतीवरून उड्या मारून रामवाडी भागातील रस्त्याने पळ काढला. या भागातून धावत असताना त्यांनी हवेत गोळीबार केल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. तिन्ही अज्ञात नांदुऱ्याच्या दिशेने गेल्याचे सीसी कॅमेऱ्यात दिसून आले. पोलिस संबंधीत रिक्षाचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी दिली.