Lok Sabha Election Vidarbha-Marathwada:लोकसभा 2024 निवडणुकीचे वारे वाहत असून, सध्या देशभरात निवडणूक रंगात आली आहे. यामध्ये विदर्भ-मराठवाडाही मागे नाही. सत्ताधारी भाजपला या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी देशातील इंडिया तर राज्यातील महाविकास आघाडीने रणनीती आखली आहे.
भगवान वानखेडे / छत्रपती संभाजीनगर : लोकसभा 2024 निवडणुकीचे वारे वाहत असून, सध्या देशभरात निवडणूक रंगात आली आहे. यामध्ये विदर्भ-मराठवाडाही मागे नाही. सत्ताधारी भाजपला या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी देशातील इंडिया तर राज्यातील महाविकास आघाडीने रणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भ-मराठवाड्यात ज्यांचा वरचष्मा असेल, त्याच पक्षाचा राज्यातील राजकारणात दबदबा राहील, असे सध्या तरी दिसून येत आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. यापैकी सर्वाधिक जागा जिंकण्याचा दावा महायुती आणि महाविकास आघाडी करत आहे. काही दिवसांपूर्वीच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, पूर्व विदर्भातील बहुतांश मतदारसंघात उमेदवारांनी अर्जसुद्धा दाखल केले आहेत. अशातच महायुतीसह महाविकास आघाडीतील पक्ष जागावाटपावर चर्चा बैठका घेत असून, अद्याप अंतिम निकालापर्यंत पोहोचल्याचे दिसून येत नाही. तेव्हा दोन्ही बाजूंकडील मित्रपक्षांतील गुंता अद्याप तरी सुटला नाही.
48 पैकी 18 खासदार विदर्भ- मराठवाड्यात
असे असतानाचा राज्यातील एकूण 48 जागांपैकी 18 जागा या विदर्भ-मराठवाड्यातील आहेत. उर्वरित 30 जागा महाराष्ट्रातील इतर विभागात येतात. परंतु या गठ्ठा 18 जागांवर विजय मिळवणे कोणत्याच युती आणि आघाडीला शक्य नाही; परंतु शह-काटशहचे राजकारण करून या एकूण 18 जागांपैकी जास्तीत जास्त जागा आपल्या पदरी पाडून घेण्याच्या तयारीत जो तो दिसत आहे.
आताची स्थिती काय?
विदर्भात सद्यस्थितीत 10 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये पाच जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत. यामध्ये अमरावतीत अपक्ष, तर रामटेकमध्ये शिवसेना (शिंदे गट) उमेदवार निवडून आले होते. तर यवतमाळ, बुलढाणा शिवसेना (शिंदे गट) खासदार आहेत. उर्वरित ठिकाणी भाजपचे प्राबल्य आहे. यामध्ये फक्त चंद्रपूर या एका जागेवर काँग्रेस विजयी झाले होते. ती जागासुद्धा सध्या रिक्त आहे.