dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील १८ हजार १२४ मतांनी विजयी

छत्रपती संभाजीनगर :  विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस  (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे १८ हजार १२४ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना ८५ हजार ८७६ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली.

छत्रपती संभाजीनगर :  विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस  (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे १८ हजार १२४ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना ८५ हजार ८७६ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. पसंतीक्रमानुसार ३९ उमेदवारांची वगळणी व मतहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतमोजणीत डॉ. पाटील यांनी सर्वाधिक मते मिळवली. भारत निवडणूक आयोगाकडून निकालासंदर्भातील पुढील प्रक्रियेस मान्यता प्राप्त झाल्यानंतर गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी डॉ. पाटील यांना विजयी घोषित केले.

 यावेळी निवडणूक निरीक्षक  माधवी खोडे-चवरे, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत व निवडणूक निरीक्षक  माधवी खोडे – चवरे यांच्या देखरेखीखाली मतमोजणी पार पडली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव या आठ जिल्ह्यांतील ८४२ मतदान केंद्रांवर झालेल्या या निवडणुकीत ४१ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीसाठी ७० टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती.

मतमोजणीच्या प्रारंभी मतपत्रिकांची पडताळणी व वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी तीन फेऱ्यांत पूर्ण करण्यात आली. पहिल्या फेरीत ७० हजार ५१९, तर दुसऱ्या फेरीअखेर एकत्रित १ लाख ४० हजार ५४३ मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. मतमोजणीच्या आकडेवारीनुसार एकूण १ लाख ७७ हजार ११५ मते वैध, तर १६ हजार ५४० मते अवैध ठरली. वैध मतांच्या आधारे विजयासाठी ८८ हजार ५५८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.

पहिल्या पसंतीच्या मतमोजणीअखेर डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ७३ हजार ९३१, सतीश चव्हाण यांना ६० हजार ७६८, अपक्ष उमेदवार रविराज उर्फ अण्णासाहेब सावळे-पाटील यांना १९ हजार ८३५, तर दिलीप घुगे यांना ८ हजार ४३९ मते मिळाली. कोणत्याही उमेदवाराने विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केला नसल्याने निवडणूक नियमांनुसार कमी मते मिळालेल्या उमेदवारांची टप्प्याटप्प्याने वगळणी करून त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार मतहस्तांतरणाची प्रक्रिया राबविण्यात आली.

मतहस्तांतरण प्रक्रियेत वगळण्यात आलेल्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार उर्वरित उमेदवारांना मते देण्यात आली. दिलीप घुगे यांच्या मतपत्रिकांमधून २ हजार २८५ मते डॉ. पाटील यांना, तर १ हजार ८८१ मते सतीश चव्हाण यांना हस्तांतरित झाली. त्यानंतर ३९व्या वगळणीत रविराज सावळे-पाटील यांच्या मतपत्रिकांमधून ६ हजार ४६९ मते डॉ. पाटील यांना, तर ३ हजार २४१ मते सतीश चव्हाण यांना हस्तांतरित झाली.

एकूण ४१ उमेदवारांपैकी ३९ उमेदवारांच्या वगळणीनंतर डॉ. प्रतापसिंह पाटील व सतीश चव्हाण हे दोन उमेदवार शिल्लक राहिले. या टप्प्यावरही कोणत्याही उमेदवाराने निश्चित कोटा पूर्ण केला नव्हता. अंतिम मतमोजणीत डॉ. पाटील यांना ८५ हजार ८७६, तर सतीश चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. डॉ. पाटील यांना १८ हजार १२४ मतांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी अधिकृत निकाल जाहीर करून डॉ. पाटील यांना विजयी घोषित केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top