प्रा. माणिकराव शिंदेंनी सोडली दाते पाटलांची साथ
उपोषणाच्या तेराव्या दिवशी जरांगे पाटलांची भेट घेऊन मांडळी वेगळी भूमिका

मराठा मावळा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी नेतृत्वाची दिशा भरकटत असल्याचे लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. समाजहिताच्या अनुषंगाने संघटनेची भूमिका स्पष्ट असावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. या घडामोडीनंतर अवघ्या दोन दिवसांत संघटनेतील चित्र बदलले. संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आपल्या नेत्याला पुन्हा सोबत ठेवण्यात मराठा मावळा संघटनेचे मावळे यशस्वी ठरल्याची चर्चा संघटनेत सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : शाश्वत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला तेराव्या दिवशी नवे वळण मिळाले आहे. मराठा आरक्षणाचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील 9 ऑगस्टपासून उपोषणाला बसले असून, आतापर्यंत त्यांना विविध मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, आंदोलनातील प्रमुख चेहरा प्रा. माणिकराव शिंदे यांनी तेराव्या दिवशी उपोषणकर्त्यांची साथ सोडून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने मराठा समाजातील राजकीय आणि सामाजिक समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे.
उपोषणाच्या बाराव्या दिवसापर्यंत मराठा सेवा संघाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे, संभाजी ब्रिगेडचे योगेश शेळके, सुनील कोटकर, मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे , नंतर आलेले लक्षण बापू शिरसाठ यांनी दाते पाटील यांच्या आंदोलनाला साथ दिली. मात्र, याच काळात मराठा मावळा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रा. शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा न देता जरांगे पाटील यांची भेट घेतली. या घडामोडीनंतर प्रा. शिंदे यांनी समाजमाध्यमांवर आपली संघटनेची कार्यकारिणी अनिश्चित काळासाठी बरखास्त केल्याची घोषणा केली होती.

त्यानंतर उपोषणाच्या तेराव्या दिवशी प्रा. शिंदे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि यापुढे त्यांच्यासोबत काम करण्याची भूमिका जाहीर केली. या निर्णयामुळे दाते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, प्रा. शिंदे यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या संघटनेतील संभाव्य अंतर्गत संघर्ष टळल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, प्रा. शिंदे यांचा दावा असा आहे की, ते सुरुवातीपासूनच जरांगे पाटील यांच्या विरोधात नव्हते. तसेच छत्रपती संभाजीनगरातील उपोषणही जरांगे यांच्या विरोधात नसल्याचे ते सांगत आहेत. जरांगे यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांना त्यांनी रोखल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
मात्र, जर अशीच भूमिका होती तर मराठा मावळा संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याच भूमिकेला विरोध का केला? जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर कार्यकारिणी बरखास्त करण्याची वेळ का आली? आणि आता तेराव्या दिवशी स्वतः प्रा. शिंदे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन भूमिका बदलण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घडामोडींमुळे छत्रपती संभाजीनगरातील मराठा आरक्षण आंदोलनातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, आगामी काळात दाते पाटील यांच्या उपोषणाला कोणकोणत्या संघटनांचा ठाम पाठिंबा राहतो आणि प्रा. शिंदे यांच्या नव्या भूमिकेचा आंदोलनावर काय परिणाम होतो, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
मराठा मावळे जिंकले!
मराठा मावळा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी नेतृत्वाची दिशा भरकटत असल्याचे लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. समाजहिताच्या अनुषंगाने संघटनेची भूमिका स्पष्ट असावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. या घडामोडीनंतर अवघ्या दोन दिवसांत संघटनेतील चित्र बदलले. संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आपल्या नेत्याला पुन्हा सोबत ठेवण्यात मराठा मावळा संघटनेचे मावळे यशस्वी ठरल्याची चर्चा संघटनेत सुरू आहे.
