मनोज जरांगे, मराठा क्रांती मोर्चाची स्वतंत्र आंदोलने

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील आंदोलनाची दिशा पुन्हा दोन वेगवेगळ्या प्रवाहांत विभागली जात असल्याचे चित्र आहे. एका बाजूला मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्रे मिळावीत आणि मिळालेल्या प्रमाणपत्रांची वैधता कायम राहावी, या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाकडून मराठा समाजाला शाश्वत आणि कायदेशीर टिकणारे आरक्षण देण्याची मागणी पुढे केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर / सतीश रेंगे
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील आंदोलनाची दिशा पुन्हा दोन वेगवेगळ्या प्रवाहांत विभागली जात असल्याचे चित्र आहे. एका बाजूला मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्रे मिळावीत आणि मिळालेल्या प्रमाणपत्रांची वैधता कायम राहावी, या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाकडून मराठा समाजाला शाश्वत आणि कायदेशीर टिकणारे आरक्षण देण्याची मागणी पुढे केली जात आहे. मनोज जरांगे पाटील आणि मराठा क्रांती मोर्चाकडून एकाच मागणीसाठी स्वतंत्र आंदोलन सुरू असल्याने समाजात संभ्रम निर्माण होत असून आंदोलकांमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू आहे.
कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून दोन्ही भूमिकांमध्ये मतभेद स्पष्ट होत आहेत. मराठा क्रांती मोर्चाने कुणबी प्रमाणपत्रांच्या माध्यमातून आरक्षणाचा मार्ग योग्य आहेच मात्र मराठा समाजाला थेट आणि टिकाऊ आरक्षण देण्याचीही भूमिका मांडली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका मांडणाऱ्या काही स्वयंघोषित अभ्यासकांवरही टीका केली आहे. आरक्षणाच्या लढ्याबाबत समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या वक्तव्यांवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. मराठा सेवा संघासह विविध संघटनांच्या भूमिकांवरूनही आंदोलनाच्या पद्धती आणि मागण्यांबाबत चर्चा सुरू आहे.
मे 2026 मध्ये जरांगे यांच्या उपोषणानंतर सरकारकडून त्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली होती. त्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रांची वैधता, जुन्या संस्थानांच्या नोंदी, आंदोलनातील गुन्हे मागे घेणे आणि शिंदे समितीला मुदतवाढ देण्यासारख्या मागण्यांचा समावेश होता. मात्र, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप आहे की, सरकारने यापूवही आश्वासने देऊन समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे केवळ आश्वासनांऐवजी न्यायालयीन कसोटीवर टिकणारे आणि कायमस्वरूपी आरक्षण द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
अभ्यासक खोटे बोलतात…
अभ्यास शासन निर्णयाने आरक्षण मिळत नसल्याचे सांगत आहेत, त्यांनी मलाही तसे सांगितल्याचा दावा ते करीत आहेत. मात्र मागील दोन वर्षात हा बोलणारा मला भेटला नाही, माध्यमांमध्ये खोटा दावा करीत असल्याची टिका मनोज जरांगे यांनी एका अभ्यासकासंदर्भात केली.
जवळच्यांकडून जरांगेची दिशाभूल

मनोज जरांगे यांची त्यांच्या काही निकटवर्तीयांकडून दिशाभूल करण्यात येत आहे. हैदराबाद गॅझेट, सगेसोयरे हे मार्ग मराठा आरक्षण मिळवून देवू शकत नाहीत हे आम्ही त्यांना सांगितले होते. मात्र त्यांचा अभ्यास नाही असे काही त्यांचे निकटवतय चुकीच्या शासन निर्णयाला संमती देऊन त्यांची दिशाभूल करीत आहेत. परिणामी जरांगे फसतात आणि समाजाचीही फसवणूक होते.
– डॉ. शिवानंद भानुसे, अभ्यासक मराठा आरक्षण

