वाशिम : राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) मार्फत रविवारी (२१ जून) आयोजित करण्यात आलेली नीट (यूजी) पुनर्परीक्षा वाशिम शहरातील १० परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने व्यापक उपाययोजना केल्या आहेत.

जिल्ह्यातील १० परीक्षा केंद्रांवर एकूण ३ हजार ९५ विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजल्यापासून परीक्षार्थींना केंद्रांमध्ये प्रवेश देण्यात आला. दुपारी १.३० वाजल्यानंतर कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत होणार असून पात्र दिव्यांग उमेदवारांना नियमानुसार अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवर प्रवेशद्वारांवर पोलीसांचा कडक पहारा ठेवण्यात आला होता. परीक्षार्थींची ओळखपत्रे, आधारकार्ड व अन्य आवश्यक कागदपत्रांची तपासणी करूनच प्रवेश देण्यात आला. तसेच बायोमेट्रिक पडताळणी, फ्रिस्किंग व स्क्रिनिंग तपासणीची प्रक्रिया राबविण्यात आली. केंद्रांवर व्हिडिओग्राफी, सीसीटीव्ही निरीक्षण तसेच सुरक्षा यंत्रणांची विशेष नजर ठेवण्यात आली आहे.
परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी प्रश्नपत्रिका वितरण, ओएमआर उत्तरपत्रिकांचे संकलन व पॅकिंग यासह सर्व प्रक्रियांवर काटेकोर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ उपकरणे, कॅल्क्युलेटर, बॅग, पर्स आदी प्रतिबंधित साहित्य परीक्षा केंद्रात आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात विशेष निर्बंध लागू करण्यात आले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाच्या नियोजनामुळे परीक्षा प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडत असल्याचे चित्र रविवारी दिसून आले.