नवी दिल्ली : ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून ‘कॉकरोच जनता पार्टी’ने शनिवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केले. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पाच दिवसांच्या आत राजीनामा द्यावा, अशी मागणी केली; तसे न केल्यास पुढील शनिवारी पुन्हा जंतर-मंतरवर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. सरकारविरोधी घोषणांनी जंतर-मंतरचा परिसर दणाणून गेला.

या आंदोलनात देशभरातून आलेले हजारो आंदोलक सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी आणि तरुणांची संख्या मोठी होती. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि या गैरप्रकाराच्या विरोधात न्याय मागण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिकही आपल्या पाल्यांसह या आंदोलनात खांद्याला खांदा लावून उभे आहेत. या आंदोलनाची हाक ‘कॉकरोच जनता पार्टीचे’ संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिली होती. ते शनिवारी सकाळीच अमेरिकेहून दिल्लीत परतले. ते विमानतळावरून थेट जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळी पोहोचले होते. परीक्षांमधील या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून, केंद्र सरकारने आणि शिक्षणमंत्र्यांनी याची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

झुरळेही घाबरत नाहीत : अभिजीत दिपके
देशातील तरुण आता घाबरणार नाहीत, ते लढा देतील. झुरळेही घाबरत नाहीत आणि ती कधी मरतही नाहीत, असे अभिजीत दिपके यांनी जंतर-मंतर येथील आंदोलकांना संबोधित करताना म्हटले.
आंदोलनकर्त्यांच्या पाच प्रमुख मागण्या…
१. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा
२. योग्य प्रशिक्षणाशिवाय घाईघाईने डिजिटल शिक्षण नको.
३. मणिपूरमधील शिक्षण व्यवस्था पूर्ववत करा.
४. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवावी.
५. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे