dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

युद्धाच्या संकटात मोठा दिलासा; भारत- युएईत एलपीजी पुरवठ्याचा करार

अबुधाबी : अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे संपूर्ण जगाला ऊर्जा संकटाची झळ बसत आहे. या युद्धाचा परिणाम कमी करण्यासाठी भारताने संयुक्त अरब अमिरातीसोबत लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस पुरवठ्याबाबत एक धोरणात्मक करार केला आहे.

अबुधाबी : अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे संपूर्ण जगाला ऊर्जा संकटाची झळ बसत आहे. या युद्धाचा परिणाम कमी करण्यासाठी भारताने संयुक्त अरब अमिरातीसोबत लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस पुरवठ्याबाबत एक धोरणात्मक करार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युएईच्या अवघ्या दोन तासांच्या संक्षिप्त दौऱ्यात या करारावर स्वाक्षरी झाली. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा एलपीजी आयातदार देश असून, जागतिक तणावाच्या परिस्थितीत पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

एलपीजी, दोन्ही देशांनी धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याबाबत एका सामंजस्य करारासह संरक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि बँकिंग क्षेत्रात मोठे करार आणि गुंतवणुकीच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. भारत आणि युएई दरम्यान ‘स्ट्रॅटेजिक डिफेन्स पार्टनरशिप’ (धोरणात्मक संरक्षण भागीदारी) च्या फ्रेमवर्कवर करार स्वाक्षरी करण्यात आला, ज्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय धोरणात्मक आणि सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत होणार आहे. एका मोठ्या गुंतवणुकीच्या घोषणेअंतर्गत, भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रासह आरबीएल बँक आणि सामन कॅपिटल मध्ये तब्बल ५ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली. 

*पंतप्रधान मोदींच्‍या संक्षिप्त दौर्‍यात महत्त्‍वाचे करार*

पंतप्रधान मोदी भारत-नॉर्डिक शिखर परिषदेला जात असताना अबुधाबी येथे काही वेळ थांबले होते. या संक्षिप्त थांब्यादरम्यान हे महत्त्वाचे करार करण्यात आले. पश्चिम आशियातील सध्याच्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर, मोदींनी आपल्या या भेटीत युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. याशिवाय, भारत आणि युएई दरम्यान दोन्ही देशांमधील धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या चौकटीबाबत एक करार आणि गुजरातच्या वाडिनार येथे ‘शिप रिपेअर क्लस्टर’ (जहाज दुरुस्ती केंद्र) उभारण्याबाबतच्या सामंजस्य करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

होर्मुझची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित राहणे महत्त्वाचे :  मोदी

होर्मुझची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित राहावी, अशी भारताची इच्छा असल्याचे मोदींनी सांगितले. पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम जगभर जाणवत असून, भारताने नेहमीच संवाद आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचे समर्थन केले आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत सर्व परिस्थितीत संयुक्त अरब अमिरातीच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला आहे आणि यापुढेही राहील. या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य पुनर्संचयित करण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top