कारंजा : समृद्धी महामार्गावरील कारंजा लाड टोल नाक्यावर महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा आयशर ट्रक ताब्यात घेतला. या कारवाईत एकूण १ कोटी ३१ लाख ५१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून प्रकरणी कारंजा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ मे रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील कारंजा लाड टोल नाक्यावर वाहन तपासणी सुरू असताना महामार्ग पोलिस विभागाचे पीएसआय कृष्ण कन्हैया पवार व त्यांच्या पथकाला संशयास्पद आयशर वाहन क्रमांक एमएच-४०-सीटी-२९६४ आढळून आले. वाहनातून गोडसर वास येत असल्याने चालकाकडे चौकशी करण्यात आली. यावेळी चालकाने वाहनात तंबाखूजन्य पदार्थ असल्याची माहिती दिली. त्यानंतर पीएसआय कृष्ण कन्हैया पवार यांनी महामार्ग पोलिस विभागाचे प्रभारी अधिकारी एपीआय नितीनकुमार दांदडे यांना माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर वाहन ताब्यात घेऊन कारंजा शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. अधिकाऱ्यांनी वाहनातील मालाची तपासणी केली असता तो प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पीएसआय कृष्ण कन्हैया पवार यांच्या फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी एपीआय नितीनकुमार दांदडे, पीएसआय कृष्णकन्हैया पवार, अमोल इंगोले व आनंद काकडे यांनी केली. पुढील तपास कारंजा शहर पोलिस करीत आहेत.