dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

लोकप्रतिनिधींच्या संतापानंतर महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम 

जालना :  शहरातील नागरी समस्या, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांच्या मुद्द्यावर लोकप्रतिनिधींनी जाहीर कार्यक्रमांत मनपा अधिकाऱ्यांचे काम उपटल्यानंतर  जालना महानगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत शनिवारी गरीब शहा बाजार आणि बसस्थानक परिसरातील तब्बल ४० अतिक्रमणे हटवली. 

शहरातील ४० अतिक्रमणे हटवली; प्रशासन अखेर मैदानात

जालना :  शहरातील नागरी समस्या, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांच्या मुद्द्यावर लोकप्रतिनिधींनी जाहीर कार्यक्रमांत मनपा अधिकाऱ्यांचे काम उपटल्यानंतर  जालना महानगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत शनिवारी गरीब शहा बाजार आणि बसस्थानक परिसरातील तब्बल ४० अतिक्रमणे हटवली. 

     जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर उभारण्यात आलेल्या पक्क्या शेड आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून शहरातील नागरी आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून महानगरपालिकेवर टीकेची झोड उठत होती. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी आणि नगरसेवकांनीच आयुक्तांच्या दालनात जाऊन विविध मागण्यांची निवेदने देत प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने राजकीय वर्तुळात उलट चर्चा रंगली होती. “सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांना आदेश द्यायचे सोडून निवेदन देत गयावया करणे, हीच प्रशासनावरील पकड सुटल्याची कबुली आहे,” अशा शब्दांत विरोधकांनी टीका केली होती.

याच पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या महसूल विभागाच्या समाधान शिबिरात खासदार डॉ. कल्याण काळे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा या बैठकीतून निघून गेल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त करत प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले होते. त्याच कार्यक्रमात आमदार अर्जुन खोतकर यांनीही शहरातील नागरी सुविधांच्या प्रश्नावरून पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. लोकप्रतिनिधींच्या या संतप्त भूमिकेनंतर शनिवारी सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गरीब शहा बाजार परिसरात मोहीम सुरू केली. या भागातील काही दुकानदारांनी रस्त्यावर पक्की शेड उभारून अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत होता. त्यानंतर पथकाने बस स्थानक रस्त्यावर कारवाई करत अनधिकृत शेड आणि बांधकामे हटवली.

ही मोहीम आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार, उपायुक्त त्र्यंबक कांबळे आणि सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. नगररचना विभागाच्या तेजश्री शिंदे, अतिक्रमण पथक प्रमुख बी. सी. राठोड, सहाय्यक अतिक्रमण अधिकारी सॅमसन कसबे, स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. लोकप्रतिनिधींच्या संतापानंतर प्रशासन अचानक सक्रिय झाल्याने शहरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

अतिक्रमणे हटवा अन्यथा कारवाई

 शहरातील रस्ते आणि नाल्यांवरील अतिक्रमणे संबंधितांनी स्वतःहून हटवावीत, अन्यथा महानगरपालिकेकडून थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त अंजली शर्मा यांनी  दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top