मेडशी : वाशिम-अकोला महामार्गावरील मेडशी बायपासजवळ गुरुवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा हॅरियर (GJ-19-BJ-2000) या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मॅक्झिमो (MH-08-AG-0967) वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात हळद काढणीच्या कामासाठी निघालेल्या १० महिला मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत.

भरधाव कारने उभ्या मॅक्झिमोला दिली धडक; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
मेडशी : वाशिम-अकोला महामार्गावरील मेडशी बायपासजवळ गुरुवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा हॅरियर (GJ-19-BJ-2000) या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मॅक्झिमो (MH-08-AG-0967) वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात हळद काढणीच्या कामासाठी निघालेल्या १० महिला मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत.
सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मेडशी येथील महिला मजूर रिधोरा येथे कामासाठी जाण्यासाठी मॅक्झिमो वाहनात बसून होत्या. वाहन रस्त्याच्या कडेला उभे असतानाच वाशिमकडून अकोल्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार रस्त्यावर उलटली, तर मॅक्झिमो वाहनाचाही मोठा चक्काचूर झाला.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलांना बाहेर काढले. सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे वाशिम व अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी महिला या सर्व मेडशी गावातील रहिवासी असून रोजंदारीसाठी जात असताना त्यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला.

मेडशी बायपास ठरतोय ‘अपघाताचा काळा ठिपका’
अकोला-नांदेड महामार्गाच्या निर्मितीनंतर मेडशी येथे बायपास देण्यात आला असला तरी रस्त्याच्या नियोजनातील त्रुटींमुळे हा मार्ग अपघातप्रवण ठरत आहे. आवश्यक ठिकाणी पूल किंवा सुरक्षितता उपाययोजना नसल्याने गावात ये-जा करताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
याआधीही अनेक गंभीर अपघात या ठिकाणी घडले असून काहींना जीव गमवावा लागला, तर काही जण कायमस्वरूपी अपंग झाले आहेत.
संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या मेडशीकरांनी गुरुवारी या घटनेनंतर अकोला-नांदेड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले.
“जोपर्यंत बायपासवर गतिरोधक, संकेतचिन्हे व इतर सुरक्षाव्यवस्था बसविल्या जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा ठाम इशारा नागरिकांनी दिला आहे.