अंबड : निसर्गाचा लहरीपणा आणि भीषण पाणीटंचाई अशा दुहेरी संकटात जिथे उभ्या पिकांना जगवणे कठीण असते, तिथे अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील एका प्रयोगशील दाम्पत्याने आपल्या अतोनात कष्टाने ‘घनदाट वनराई’ फुलवण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.

अंबड : निसर्गाचा लहरीपणा आणि भीषण पाणीटंचाई अशा दुहेरी संकटात जिथे उभ्या पिकांना जगवणे कठीण असते, तिथे अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील एका प्रयोगशील दाम्पत्याने आपल्या अतोनात कष्टाने ‘घनदाट वनराई’ फुलवण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. बाबासाहेब शेळके आणि सविता शेळके या दाम्पत्याच्या या जिद्दीचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून कृषी सहाय्यकांनी पाहणी करून या स्तुत्य उपक्रमाबदृल शेळके यांचा उत्साह वाढवला आहे.
अंबड तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असताना अनेक ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. मात्र, डोमेगाव येथील बाबासाहेब शेळके आणि त्यांच्या पत्नी सविता शेळके यांनी खचून न जाता उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले. अगदी टंचाईच्या काळातही पाण्याचा थेंब न् थेंब जपून वापरत त्यांनी आपल्या परिसरातील वनराई हिरवीगार ठेवली आहे. केवळ झाडे लावून न थांबता, ती मुलांप्रमाणे जोपासण्याचे काम या दाम्पत्याने सातत्याने केले आहे. दरम्यान शेळके दाम्पत्याच्या या स्तुत्य उपक्रमाची माहिती मिळताच कृषी सहाय्यक दिव्या तळेकर यांनी डोमेगाव येथे भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण वनराईची पाहणी केली. अत्यंत कष्टाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने जोपासलेली ही वनराई पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. वाढत्या तापमानामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असताना डोमेगावच्या या वनराईमुळे वातावरण शितल वाटते. शेळके दाम्पत्याने दाखवून दिले की, जर जिद्द आणि मेहनतीची जोड असेल, तर निसर्गही साथ देतो. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे पर्यावरण संतुलित राखण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा यापूर्वी शासनाकडून वनश्री पुरस्काराने सन्मानही करण्यात आलेला आहे.
– पर्यावरण संवर्धनाचा हा आदर्श घ्यायला हवा
आजच्या काळात जेव्हा वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे, तेव्हा शेळके दाम्पत्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई असतानाही इतकी घनदाट वनराई जोपासणे ही बाब इतरांसाठी प्रेरणादायी आहे. पर्यावरण संवर्धनाचा हा आदर्श प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवायला हवा, अशा शब्दांत कृषी सहाय्यक दिव्या तळेकर यांनी शेळके कुटुंबाचे कौतुक केले.


