Asha Bhosle : गायिका आशा भोसले यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. बॉलिवूड गायकांनी ‘अभी ना जाओ छोडकर’ हे गाणे गाऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

शिवाजी पार्कमध्ये साश्रू नयनांनी ‘स्वरयोगिनी’ला निरोप
मुंबई : गायिका आशा भोसले यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. बॉलिवूड गायकांनी ‘अभी ना जाओ छोडकर’ हे गाणे गाऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

सकाळी, अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी, कासा ग्रांडे येथे ठेवण्यात आले होते. रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. आशा भोसले यांनी आपल्या ८२ वर्षांच्या गायन कारकिर्दीत नऊ फिल्मफेअर पुरस्कारांसह १०० हून अधिक पुरस्कार जिंकले. त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय कलाविश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. आशाताईंचे भारतीय कलेतील योगदान अतुलनीय असल्याने, राज्य सरकारतर्फे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हवेत फैरी झाडून आणि शोकधून वाजवून या महान गायिकेला मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवावर तिरंगा लपेटण्यात आला होता. प्रशासकीय अधिकारी, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
दिग्गजांकडून अंत्यदर्शन आणि आदरांजली
आशाताईंचे पार्थिव लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या थोर गायिकेचा निरोप घेण्यासाठी आणि त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच चाहत्यांची आणि मान्यवरांची मोठी गर्दी लोटली होती. क्रीडा, राजकीय, सामाजिक आणि चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांनी त्यांच्या निवासस्थानी पोहोचून श्रद्धांजली अर्पण केली. आशाताईंच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती नव्हे, तर भारतीय चित्रपट संगीताचा चालता-बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


