MP Supriya Sule becomes ‘angel’ : पवित्र उमरा हजची यात्रा करून मायभूमीकडे परतण्याच्या तयारीत असलेल्या तालुक्यातील ४१ प्रवाशांवर सौदी अरेबियातील रियाधमध्ये मोठे संकट ओढवले होते. विमान कंपनीने ऐनवेळी तिकीट रद्द केल्याने हतबल झालेल्या या भाविकांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या तत्परतेमुळे आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या पाठपुराव्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

भोकरदन : पवित्र उमरा हजची यात्रा करून मायभूमीकडे परतण्याच्या तयारीत असलेल्या तालुक्यातील ४१ प्रवाशांवर सौदी अरेबियातील रियाधमध्ये मोठे संकट ओढवले होते. विमान कंपनीने ऐनवेळी तिकीट रद्द केल्याने हतबल झालेल्या या भाविकांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या तत्परतेमुळे आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या पाठपुराव्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर आता या सर्व भाविकांचा परतीचा प्रवास सुकर झाला असून, ते तीन टप्प्यांत मायदेशी परतणार आहेत. भोकरदन व जाफ्राबाद परिसरातील भाविक २२ मार्च रोजी यात्रेसाठी सौदीला गेले होते. दर्शन आटोपून ६ एप्रिल रोजी ‘अकासा एअर’च्या विमानाने ते मुंबईला येणार होते. मात्र, मध्यपूर्वेतील बिघडलेल्या परिस्थितीचे कारण देत कंपनीने अचानक उड्डाण रद्द केले. परदेशात, अनोळखी ठिकाणी आणि भाषेची अडचण असताना अचानक विमान रद्द झाल्याने या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. एअरलाईन्सकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने हे भाविक तेथे अडकून पडले होते. नेत्यांची तत्परता आणि ‘दिल्ली’ कनेक्शन : ही माहिती मिळताच भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि सुधाकर दानवे यांनी तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी थेट खा. सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. खा.सुळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि रियाधमधील भारतीय दूतावासाशी थेट संवाद साधला. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरूनही हा विषय लावून धरल्याने प्रशासकीय पातळीवर वेगाने चक्रे फिरली आणि ‘अकासा एअर’ला प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यास भाग पाडले.
– असा असेल परतीचा प्रवास
भारतीय दूतावासाच्या मध्यस्थीनंतर, प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता त्यांना ८ ते १० एप्रिल दरम्यान तीन टप्प्यांत भारतात आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
८ एप्रिल रोजी १२ प्रवासी जेद्दा ते मुंबई, ९ एप्रिल रोजी १५ प्रवासी जेद्दा ते मुंबई व १० एप्रिल रोजी १४ प्रवासी जेद्दा ते मुंबईला परतणार आहे.


