Farmers’ anger flared : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आडोळी येथील ग्रामस्थांनी आंदोलन तीव्र केले असून, ‘सातबारा कोरा करा’ या प्रमुख मागणीसाठी गावच विक्रीस काढण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे.

‘सातबारा कोरा करा’ची मागणी; आंदोलनाचा तिसरा दिवस तापला
वाशिम : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आडोळी येथील ग्रामस्थांनी आंदोलन तीव्र केले असून, ‘सातबारा कोरा करा’ या प्रमुख मागणीसाठी गावच विक्रीस काढण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध नोंदवला. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
गेल्या काही वर्षांपासून नापिकी, अवकाळी पाऊस, वाढता कर्जबोजा आणि अपुऱ्या पीकविम्यामुळे आडोळीतील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वारंवार शासनाकडे मागण्या करूनही ठोस निर्णय न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी संपूर्ण गाव विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला. गावाच्या प्रवेशद्वारावर ‘गाव विक्रीस आहे’ असे फलक लावून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध असो’, ‘कर्जमाफी द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून प्रशासनावरही दबाव वाढताना दिसत आहे. मात्र, अद्याप शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका समोर आलेली नाही.


