Chhatrapati Sambhajinagar News : सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह शुक्रवार, 3 एप्रिल रोजी बाळापूर शिवारातील एका कोरड्या विहिरीत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह शुक्रवार, 3 एप्रिल रोजी बाळापूर शिवारातील एका कोरड्या विहिरीत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भीमराव कारभारी घुगे (62 वर्ष), रा. हरिराम नगर, बाळापूर असे मयत सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असल्याची माहिती चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलिस दलातील भीमराव घुगे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर बाळापूर परिसरातील हरिराम नगरातील शांतीबन येथे राहत होते. शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बाळापूर शिवारातील एका कोरड्या विहिरीत एक व्यक्ती पडला असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. मनपा अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, उपअग्निशमन अधिकारी हरिभाऊ घुगे, डयुटी इन्चार्ज, संदीप चव्हाण, अग्निशामक जवान दिनेश मुंगसे, प्रसाद शिंदे, दिपक गाडेकर, जगदीश सलामबाद आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीतून एका व्यक्तीस बेशुध्दावस्थेत बाहेर काढले असता, ती व्यक्ती सेवानिवृत्त पोलिस उपनरिीक्षक भीमराव घुगे असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, भीमराव घुगे यांना बेशुध्दावस्थेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तांगडे करीत आहेत.


